बॉम्बशोधक पथकाने १६ जिलेटिनच्या कांड्या, १७ डेटोनेटर्स आणि दोन मोठ्या बॅटऱ्यांसह सर्व साहित्य घेतले ताब्यात

मुंब्रा रेतीबंदर किनारी पुन्हा एकदा जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर्स मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकूण १६ जिलेटिनच्या कांड्या आणि १७ डेटोनेटर्स पोलिसांनी जप्त केले असून या कांड्या पाण्याखाली स्फ़ोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येतात अशी माहिती देण्यात आली. परंतु या कांड्यांपैकी अनेक कांड्या या जिवंत असल्याने त्या इतर ठिकाणी स्फ़ोट घडवून आणण्यासाठी देखील वापरल्या जाऊ शकतात.
मुंब्रा रेतीबंदर हे मृतदेह फेकण्यासाठी एक कुख्यात ठिकाण बनले असून येथे अवैधरित्या रेती उत्खननाचे काम देखील गेले अनेक वर्ष अविरतपणे सुरू आहे. रेतीबंदर भाग पुन्हा एकदा जिलेटीन कांड्या आणि डेटोनेटर्स मिळाल्याने चर्चेत आला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कळवा रेती बंदर परिसर खाडीचे सुशोभीकरण करून येथे रेतीबंदर विसर्जन घाट बनवण्यात आला. या परिसरामध्ये असलेली निसर्गरम्य वातावरण लक्षात ठेवून महानगरपालिकेने या ठिकाणी नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली मात्र आता हीच सुविधा या परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना धोकादायक वाटत आहे. या परिसरात मागील वर्षभरात 15 मृतदेह सापडले आहेत. ज्यामध्ये दोन हत्या या उघडकीस आल्या आहेत या ठिकाणी असलेला सुरक्षेचा अभाव आणि शेजारीच असलेला राष्ट्रीय महामार्ग याचाच फायदा घेत गैरकृत्य करणारी लोक या भागात मृतदेह फेकत आहेत. पोलीस आणि पालिका प्रशासन यांचा देखील हलगर्जीपणा होत असल्यामुळेच हे प्रकार येथे वारंवार घडत आहेत. रात्री या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसते आणि याचाच फायदा घेत मृतदेह फेकण्याचे प्रकार आता वाढू लागले आहेत. खाडी मध्ये टाकलेला मृतदेह स्वतःहून नष्ट होण्याच्या मार्गावर असतो आणि म्हणूनच या परिसरात मृतदेह टाकण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत.आता याच ठिकाणी जिवंत जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर्स मिळाल्याने प्रशासन हादरले आहे. त्यामुळे खाडीकिनारी गस्त वाढवायची गरज असताना रात्रीच्या वेळी इथे मात्र स्मशानशांतता असते. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने १६ जिलेटिनच्या कांड्या, १७ डेटोनेटर्स आणि दोन मोठ्या बॅटऱ्यांसह सर्व साहित्य ताब्यात घेतले असून सखोल चौकशी सुरु केली आहे. घटनास्थळावरून एक मोबाईलचा रिकामा खोका देखील मिळाला असून त्यावर असलेल्या imei नंबर चा वापर गुन्हेगारांना शोधण्या साठी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading