माजी पोलीस आयुक्तांविरूध्द अकोल्यामध्ये दाखल झालेला गुन्हा ठाण्यात वर्ग

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह इतर अधिकार्‍यांविरुद्ध अकोल्यामध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा ठाणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तपदी असताना परमवीर सिंग यांनी हजारो कोटींचा भष्ट्राचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालकांकडे केली होती. त्याबरोबरच परमवीर सिंग यांच्यासह काही बड्या पोलीस अधिकार्‍यांनी घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन पोलिसांनी परमवीर सिंग यांच्यासह अनेक अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार ठाण्यात घडल्याने अकोला पोलिसांनी हा गुन्हा ठाणे पोलिसांकडे वर्ग केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील तत्कालीन पोलीस उपायुक्त पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, सहायक पोलीस आयुक्त विजय फुलकर, व्हि बी कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी, यांच्यासह ३३ अधिकारी कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेकडे १०० कोटी रुपये मागितल्याचा आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अनेक पोलीस अधिकार्‍यांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये त्यांच्याविरुद्ध हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading