महासभेमध्ये नगरसेवकांचा आवाज बंद केला जात असल्याच्या मुद्यावर अश्रफ शानू पठाण आक्रमक

महासभेमध्ये नगरसेवकांचा आवाज बंद केला जात असल्याच्या मुद्यावर स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण हे पुन्हा आक्रमक झाले. 16 वर्षे एकाच जागेवर बसलेल्या अधिकार्‍यांकडून जाणीवपूर्वक नगरसेवकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करीत अशा अधिकार्‍यांच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ असा इशाराही पठाण यांनी दिला आहे. हजारो मतांच्या फरकाने निवडून येणारे नगरसेवक हे आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्याच्या उद्देशाने सभागृहामध्ये आपले मत मांडत असतात. मात्र सध्या कोरोनाच्या नावाखाली घेण्यात येत असलेल्या ऑनलाईन महासभेत प्रशासनाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले की लगेचच संबंधित नगरसेवकाचा आवाज बंद करण्यात येतो. जे अधिकारी एकाच जागेवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले आहेत. अशा अधिकार्‍यांकडूनच नगरसेवकांचा आवाज दाबला जात आहे. हजारो लोकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नगरसेवकांचा आवाज दाबणे म्हणजे जनतेचा आवाज दाबण्यासारखेच आहे. यासीन कुरेशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकाला आपल्या न्याय्य मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा द्यावा लागत आहे. यावरुनच हे प्रशासन किती बेरकी आहे याचा अंदाज येत आहे. जर नगरसेवकांनाच न्याय मिळत नसेल तर ते जनतेला काय न्याय देणार? असा सवाल आता जनतेमधूनच उपस्थित होणार आहे. नगरसेवक राष्ट्रवादीचा असो, की सेना-भाजप-काँग्रेसचा; त्यांचा आवाज दाबला जाणार असेल तर ते अजिबात सहन करणार नाही. जे अधिकारी असे कृत्य करीत आहेत. अशा अधिकार्‍यांच्या विरोधात आपण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागू असा इशारा शानू पठाण यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading