महावीर जैन रुग्णालय आणि प्रताप आशर कार्डिॲक सेंटरचे उद्घाटन

ठाणेकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात देण्याच्या दृष्टीने ठाण्यातील लुईसवाडी येथील हाजुरी परिसरात ठाणे महापालिका आणि जितो ट्रस्टच्या संयुक्त प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या महावीर जैन रुग्णालय आणि प्रताप आशर कार्डिॲक सेंटरचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. उथळसर येथील ठाणे महापालिकेच्या जुन्या शाळेचा पुनर्विकास करून महापालिका आणि जितो ट्रस्टच्या संयुक्त प्रयत्नांतून आयबी आणि आयसीएसई शाळा उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही यावेळी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या साडे चार वर्षात शहरात राबविलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. दरम्यान राज्यात आचारसंहिता संपताच क्लस्टर योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ होणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले. समाजातील कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता ठाणे शहरातही कर्करोगावरील प्रभावी उपचाराची सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, ठाणे महापालिका आणि जितो ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ओवळा येथे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार असून याबाबतच्या सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच जवाहरबाग येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या स्मशानभूमीचे लोकार्पणही करण्यात आले. ठाण्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी हाजुरी येथे अद्ययावत महावीर जैन रुग्णालय आणि प्रताप आशर कार्डिॲक सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. १०८ खाटांच्या या रुग्णालयात कॅथलॅब, १६ खाटांचे डायलिसिस सेंटर, रेडिओलॉजी विभाग, अत्याधुनिक रोगनिदान केंद्र, बायपास आणि अन्य प्रगत शस्त्रक्रियांसाठी तीन ऑपरेशन थिएटर्स, नेत्रदोषांवरील शस्त्रक्रियांसाठी विशेष ऑपरेशन थिएटर, १६ खाटांचे आयसीयू, रुग्णांच्या नातलगांसाठी निवास आणि भोजन व्यवस्था आदी सोयींचा समावेश या रुग्णालयात करण्यात आला आहे. ठाण्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी उथळसर येथे आयबी आणि आयसीएसई शाळेची निर्मिती होणार आहे. पारंपरिक शिक्षणक्रमासोबतच कौशल्य विकासासाठी व्होकेशनल ट्रेनिंग कार्यशाळाही शाळेत असणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय समाजकल्याण मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाशी संबंधित दीनदयाळ दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या समन्वयाने येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही विशेष शाळा सुरू केली जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading