महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी ‘सहकार संवाद’ तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरु

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे (सोसायटी) पदाधिकारी आणि सभासद यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता धावाधाव करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी ‘सहकार संवाद’ तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे.या तक्रार निवारण पोर्टलचे लोकार्पण नुकतेच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर त्याचे तात्काळ निवारण होणार असल्यामुळे सोसायट्यांनी ‘सहकार संवाद’ या पोर्टलवर तक्रार करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. सहकारी गृहनिर्माण सोसायट्या म्हटल्या की, कार्यकारी समिती आणि सदस्यांमध्ये वादविवाद हे आलेच. हे वाद सोडवण्यासाठी निबंधक कार्यालय अथवा सरकारी यंत्रणांकडे धावाधाव करावी लागते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचे गणित जुळत नसल्याने अनेकजण तक्रारी करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दिरंगाईमुळे वाद चिघळून न्याय मिळण्यास विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन गृहनिर्माण महासंघाने पुढाकार घेऊन गृहनिर्माण सोसायट्यांसाठी ‘सहकार संवाद’ तक्रार निवारण पोर्टल सुरु केले आहे.’आमची संस्था आमचे प्रश्न’ या टॅगलाईनअंतर्गत या संकेतस्थळाच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न २४ तासांच्या आत निवारण करण्यात येणार आहे. तक्रारदाराने पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवताच संबंधित विभाग या तक्रारीची दखल घेईल. तक्रार प्राप्त होताच तक्रारदार व्यक्तीला एसएमएसद्वारे किंवा ई-मेल आयडीवर संदेश पाठवला जाईल. पुढील कारवाईसाठी तक्रार संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना पाठवली जाईल. अधिकाऱ्यांकडून वेळेत तक्रार निवारण न झाल्यास पुन्हा त्या तक्रारीचा आढावा घेऊन संबधित अधिकाऱ्यांशी व्यक्तीशः संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तरीही तक्रारीचे समाधान न झाल्यास संबधित विभागाकडे अपील करता येईल. असे सीताराम राणे यांनी सांगितले. गृहनिर्माण सोसायट्यांच्या अनेक तक्रारींचे निवारण तात्काळ व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या सहकार विभागामार्फत महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने ‘सहकार संवाद’ हे ऑनलाइन पोर्टल सुरु केले आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना या पोर्टलवर घरबसल्या तक्रार नोंदवता येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सहकार विभागासह इतर संबंधित विभागांना तक्रारी पाठवता येणार आहेत. त्यामुळे घरबसल्या तक्रारीचे निवारण होणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन तक्रार निवारण जलद व्हावे. या हेतुने ‘सहकार संवाद’ या पोर्टलच्या माध्यमातुन सहकार विभाग गृहनिर्माण सोसायट्याच्या दारी आला आहे. तेव्हा, सोसायट्यांनी पोर्टलवर थेट तक्रार करून तक्रारीचे निवारण करून घ्यावे.
असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading