महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेंची येत्या शनिवारी मूस चौकाऐवजी गजानन महाराज चौकात सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या ९ एप्रिलला ठाण्यात सभा होणार असून या सभेचं ठिकाण मात्र बदलण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गडकरी रंगायतन जवळील मूस चौकात सभा घेण्यासाठी प्रयत्न चालवला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ पदाधिका-यांनी या दृष्टीकोनातून काल ठाण्यात पाहणीही केली होती. मात्र पोलीसांनी मूस चौकात सभा घेण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ही सभा गजानन महाराज चौकात केल्याचं निश्चित केलं आहे. पोलीसांनी हायलँड मैदान अथवा काशीनाथ घाणेकर येथे सभा घेण्याचे पर्याय दिले होते. गडकरी रंगायतनमध्ये त्याच दिवशी राष्ट्रीय हिंदी कवी संमेलन होणार असल्यामुळे एकाच वेळी दोन्ही ठिकाणी बंदोबस्त ठेवणं शक्य होणार नसल्यानं मूस चौकातली जागा नाकारली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गजानन महाराज चौकात सभा घेण्याची पोलीसांकडे मागणी केली होती. त्याला पोलीसांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता ९ एप्रिलला राज ठाकरे यांची उत्तरपूजा या सभेत होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिका-यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं शनिवारच्या सभेत राज ठाकरे या सर्वावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading