महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दिवा परिसराला वाढीव पाणी पुरवठा करण्यास प्रारंभ

दिवा परिसरामधील वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक घेवून दिवा शहराला दैनंदिन 6.50 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पुरविणेबाबतचे आदेश दिले होते, त्यानुसार प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करुन दिव्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपासून वाढीव पाणीपुरवठा देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे दिवावासियांना मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याने दिवावासियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दिवा परिसरामधील वाढती लोकसंख्या विचारात घेता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेकडून सद्य:स्थितीत होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत होता, त्यामुळे त्या परिसरामध्ये भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागत होते. ठाणे शहरातील पाणी समस्या सोडविण्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती. या बैठकीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. ठाणे शहराला होणारा अपुरा पाणीपुरवठा विचारात घेऊन, ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी तानसा आणि बारवी धरणातून ५० दशलक्ष लिटर प्रतिदिन आणि मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातील २० दशलक्ष लिटर प्रतिदिन प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसराला उपलब्ध करुन देणेबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. तसेच दिवा विभागासाठी पुरेसा
आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी भातसा धरणातुन ठाणे महापालिकेला ६.५० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका वाढीव पाणी पुरवठा जलसंपदा विभागाने वितरीत करावा तसेच ठाणे महापालिकेने स्वतःच्या योजनेतून ६.५० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना वागळे परिसराकरिता उपलब्ध करुन, त्या बदल्यात Barter पध्दतीने दिवा परिसराकरिता ६.५० दशलक्ष लिटर प्रतिदिन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वाढीव पाणी पुरवठा त्वरीत करावा असा निर्णय सुध्दा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून भातसा धरणातून ६.५ दशलक्ष लिटर प्रति दिन वाढीव पाणी पुरवठा त्वरीत सुरु करण्यात आला आहे. तसेच Barter पध्दतीने पाणी पुरवठा करणेकरिता आवश्यक ती नळ जोडणी, मीटर बसविणे इ. कार्यवाही करुन, नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे यांचे हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतून ६.५ दशलक्ष लिटर प्रति दिन पाणी पुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेकरिता सुरु करण्यात आला आहे. तद्नंतर निळजे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या नळ संयोजनातुन दिवा विभागाकरिता वाढीव पाणी पुरवठा स्थानिक माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांचे हस्ते सुरु करण्यात आला. दिवा परिसराकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेकडून वाढीव पाणी पुरवठा सुरु केल्याने पाणी समस्या दूर होण्यास हातभार लागणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading