महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकास लुटणा-या ८ जणांच्या टोळीचा छडा लावण्यात पोलीसांना यश

महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकास लुटणा-या ८ जणांच्या टोळीचा छडा लावण्यात ठाणे गुन्हे शाखा युनिट १ ला यश आलं असून ही टोळी कसायाला जनावरं विकण्यासाठी जनावरं देखील चोरून विकत असल्याचं उघडकीस आलं आहे. एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी ही माहिती दिली. कळवा पोलीस ठाण्यात १६ सप्टेंबर रोजी एक दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. ११ सप्टेंबर रोजी सोहेल आणि त्याचे मालक डोंगरी येथून मालाचे पैसे घेऊन संगमनेरकडे जात होते. त्यावेळी खारेगाव टोलनाक्यावर त्यांच्या गाडीसमोर कार आडवी टाकून ७ ते ८ जणांनी गाडीसह सर्वांना मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर नेऊन मारहाण केली आणि त्यांच्याकडील रोकड तसंच त्यांची कार घेऊन त्यांनी धूम ठोकली. ही मंडळी गुलबर्गा येथे पळून गेल्याची माहिती युनिट १ ला मिळाली होती. त्यानुसार युनिट १ च्या पथकानं कर्नाटकातील दीडशे लॉजची तपासणी केली. त्यावेळी एका लॉजमध्ये मुंबईतील काहीजण असल्याचं त्यांना कळलं. त्यांच्यावर पाळत ठेवून भिवंडीतील मोजम शेख, अबु अन्सारी, सय्यद मुसा, फिरोज सय्यद या चौकडीला अटक केली. त्यांच्या चौकशीतून अन्य एका लॉजमधून महम्मद शेख, शाकीर शेख आणि वाहीद शेख अशा चौघांना अटक करण्यात आली तर त्यांचा म्होरक्या अकबर शेखचा पोलीस शोध घेत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading