महापौरांनी नियम डावलून कोरोना लस घेतल्याचा मनोहर डुंबरेंचा आरोप

कोरोना आपत्तीच्या काळात झोकून देत कार्य न करता ठाणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौर नरेश म्हस्के यांनी नियम डावलून स्वत: कोरोना लस घेतली. महापौरांबरोबर शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी घेतलेली कोरोना लस म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. ठाण्याच्या इतिहासात नरेश म्हस्के यांच्यासारखा नियम डावलणारा महापौर झाला नाही, अन्, होणारही नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. लस पूर्णपणे सुरक्षित आहे हे सर्वाना समजण्याकरिता लस घेतली असल्याचा महापौरांचा दावा आहे. मात्र, याबाबत सरकारी आदेश दाखविणार का, असा सवालही डुंबरे यांनी केला आहे. महापालिकेने बाळकूम येथे उभारलेल्या विशेष कोविड हॉस्पिटलमध्ये २० फेब्रुवारी रोजी महापौर आणि आमदार रवींद्र फाटक यांनी लस घेतली होती. तसेच आपले फोटोसेशन करून घेतले होते. या प्रकाराला मनोहर डुंबरे यांनी आक्षेप घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाशी युद्ध करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोना लस दिली जात आहे. त्यात फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नगरसेवक वा कोणताही लोकप्रतिनिधी हा फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समावेश केलेला नाही. त्यानंतरच्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचा समावेश केलेला आहे. असे असतानाही महापौर आणि आमदारांनी बेकायदेशीरपणे कोरोना लस घेतली. कोरोना लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरविताना आरोग्य आणि पोलिसांबरोबरच लोकप्रतिनिधींचाही समावेश करावा, अशी मागणी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. ती पूर्ण झाली नाही. मात्र आपल्या पदाचा गैरवापर करीत रुग्णालय प्रशासनावर दबाव टाकून स्वत:ला लस टोचून घेतली, असा आरोप डुंबरे यांनी केला आहे. केवळ स्वार्थापोटी वैयक्तिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा असा महापौर झाला नाही आणि भविष्यातही होणार नाही, असा टोलाही डुंबरे यांनी लगावला. महापौर कार्यालयातून आपल्याकडे कोविड लस घेण्यासाठी पॅनकार्ड आणि आधारकार्डची प्रत मागण्यात आली. भविष्यातील लसीकरणासाठी यादी तयार केली जात असल्याचे वाटले होते. त्यानंतर लगेच लस घेण्याची सुचना करण्यात आली. या संदर्भात सरकारी यंत्रणांकडे चौकशी केल्यावर केवळ फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आपण लस घेतली नाही. मात्र, महापौरांनी बेकायदेशीररित्या लस घेतल्याचे स्पष्ट झाले आहे असा आरोप मनोहर डुंबरे यांनी केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading