महापालिकेच्या मुंब्रा हॉस्पिटलवरील कोट्यवधींचा खर्च कोणाच्या घशात – निरंजन डावखरेंचा प्रश्न

महापालिकेच्या मुंब्रा-कौसा येथील नियोजित हॉस्पिटलवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. मात्र, तब्बल १३ वर्षांनंतरही हॉस्पिटल सुरू न झाल्यामुळे नागरिकांना साधे उपचारही घेता येत नाहीत. नियोजित हॉस्पिटलचे कोट्यवधी रुपये कोणाच्या घशात गेले, असा प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर चार रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर डावखरे यांनी हॉस्पिटलला भेट दिली त्यानंतर ते बोलत होते. मुंब्रावासियांचे सरकारी हॉस्पिटलअभावी हाल होत आहेत. त्याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल अत्यंत दाटीवाटीच्या जागेत उभारले गेले आहे. मात्र, मुंब्र्यात सरकारी आरोग्य सुविधा नसल्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. तसेच महापालिकेच्या नियोजित हॉस्पिटलवर तब्बल १३ वर्षांपासून आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, हॉस्पिटल उभारले गेले नाही. त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत आणि दर्जेदार उपचार झाले असते. मात्र, या हॉस्पिटलकडे जाणूनबूजून दुर्लक्ष करण्यात आले. हॉस्पिटलवर झालेला खर्च कोणाच्या घशात गेला, असा आरोप डावखरे यांनी केला. वेदांत हॉस्पिटलमधील घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी घोडबंदरच्या दिया हॉस्पिटलमधील रुग्णांना ऑक्सिजनअभावी हलवावे लागले. भंडारा, विरारमधील घटनांमधून महापालिका प्रशासन कोणताही धडा शिकले नाही. त्यामुळे मुंब्रा येथील आजची घटना घडली. हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात प्रशासनाने धन्यता मानली. आणखी किती बळी गेल्यावर महापालिकेचे प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत असा प्रश्नही निरंजन डावखरे यांनी केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading