महापालिकेच्या कोविड रूग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा अविनाश जाधव यांचा इशारा

ठाणे महापालिकेच्या कोविड रूग्णालयात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. ठाणे महापालिकेनं कोविड रूग्णालयासाठी निविदा काढली होती. मात्र ही निविदा ज्यांना मंजूर करण्यात आली होती. त्यांना देण्याऐवजी त्यांना बाजूला करून दुस-याच कंपनीला जादा दरानं ही निविदा देण्यात आली. ओम साई केअर प्रा. लि. या कंपनीला ही निविदा देण्यात आली असून या कंपनीबाबत ब-याच तक्रारी यापूर्वीही होत्या. या कंपनीच्या अंतर्गत कोविड रूग्णालय चालू असताना कोविड रूग्णांना पैसे घेऊन प्रवेश दिल्याचं प्रकरणंही घडलं होतं. त्याचवेळी खोटी ओळखपत्र देऊन लसीकरणही करण्यात आलं होतं. या रूग्णालयात शवागारातील कर्मचारी रूग्णांच्या खिशामध्ये हात घालून चाचपणी करत असल्याच्याही तक्रारी पुढे आल्या होत्या. याप्रकरणी अविनाश जाधव यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना काही दस्तावेज सादर केले. मात्र महापालिका आयुक्त याबाबत काही करू शकतील असं वाटत नसल्यामुळे आता त्यांनी या भ्रष्टाचार प्रकरणात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे ठरवले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading