महापालिकेच्या कोरस प्रसूतीगृहामध्ये प्रथमच दोन महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी

लोकमान्य नगर येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक कोरस प्रसूतीगृहामध्ये प्रथमच दोन महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य केंद्र आणि प्रसूतीगृहांच्या समन्वयक डॉ. राणी शिंदे यांनी दिली. महापालिका कार्यक्षेत्रातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब नागरिकांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध व्हावी यासाठी विविध ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याच अंतर्गत लोकमान्यनगर येथील प्रसूतीगृह सुरू करण्यात आले आहे. वागळे इस्टेट विभागामध्ये येणाऱ्या लोकमान्यनगर, यशोधन नगर, इंदिरानगर, सावरकरनगर, येऊर, शिवाईनगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर आदी विभागातील नागरिक कोरस प्रसूतीगृहात नावनोंदणी करीत असतात. बहुतांशवेळा सिझेरियनची आवश्यकता असलेल्या गर्भवती महिलांना कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाठविले जात होते. मात्र त्यात बराच वेळ जात असल्यामुळे गरोदर मातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून कोरस प्रसूतीगृहात अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. काल तिथे दोन महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून या महिला किसननगर आणि इंदिरानगर येथे राहणाऱ्या आहेत.
छत्रपती शिवाजी रुग्णालयात दोन स्वतंत्र प्रसूती शस्त्रक्रिया कक्ष बांधण्याचे काम सुरू आहे. दोन आठवड्यात हे दोन्ही कक्ष कार्यान्वित होतील असे वैद्यकीय अधिक्षक अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले. तसेच कोपरी प्रसूतीगृहात आप्तकालीन सिझेरियन शस्त्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading