महापालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या उद्या प्रसिद्ध होणार

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या २३ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांकडून २३ जून ते १ जुलै या कालावधीत हरकती आणि सूचना मागविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. नागरिकांना ठाणे महापालिकेच्या प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या www.thanecity.gov.in या वेबसाईटवर आणि निवडणूक विभाग ( मुख्यालय ) आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
कल्याण ग्रामीण, ओवळा – माजिवडा , कोपरी पाचपाखाडी, ठाणे आणि मुंब्रा – कळवा या विधानसभेच्या मतदार याद्या ठाणे महापालिका प्रभाग रचनेनुसार मतदारांचे विभाजन प्रभाग निहाय विभागून महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारूप मतदार याद्या २३ जून रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. २३ जून ते १ जुलै या कालावधीत नागरिकांकडून प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादीवर हरकती-सूचना मागविण्यात येणार आहेत. यामध्ये लेखनिकांच्या काही चूका असल्यास त्या सुधारणे, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असल्यास ते वगळणे, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत नाव असूनही, महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आदीबाबत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. नागरिकांच्या लेखी हरकती- सूचना महापालिकेच्या संबंधित प्रभाग समिती कार्यालयात स्विकारण्यात येतील. नमूद मुद्यांव्यतिरिक्त अन्य मुद्यांवरील हरकती – सूचना स्विकारल्या जाणार नाहीत. तसेच उपरोक्त मुद्याव्यतिरिक्त आणि मुदतीनंतर दाखल झालेल्या हरकती – सुचना विचारात घेतल्या जाणार नसल्याने नागरिकांनी मुदतीत आपल्या हरकती – सूचना दाखल कराव्यात. यामध्ये नविन प्रभाग क्रमांक १,२,३,४,५,९ मधील नागरिकांनी सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त माजिवडा – मानपाडा प्रभाग समिती, प्रभाग क्रमांक ६,७,८,१०,११,१२ – सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त वर्तकनगर प्रभाग समिती, प्रभाग क्रमांक १३,१४,१५,१६,२३-सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त लोकमान्यनगर सावरकरनगर प्रभाग समिती, प्रभाग क्रमांक १७,१८,१९,२० – सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त उथळसर प्रभाग समिती, प्रभाग क्रमांक २२,२४,२५,२६,२७ – सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त वागळे प्रभाग समिती, प्रभाग क्रमांक २१,२८,२९, ३० – सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त नौपाडा – कोपरी प्रभाग समिती, प्रभाग क्रमांक ३१,३२,३३,३४,३५,३६ सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त कळवा प्रभाग समिती, प्रभाग क्रमांक ३७,३८,३९, ४०,४१,४२ सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती तसेच प्रभाग क्रमांक ४३,४४,४५,४६,४७ – सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग समिती यांच्याकडे लेखी हरकती सूचना दाखल कराव्यात. नागरिकांनी संबंधित प्रभागांच्या मतदार यादी हरकती – सूचना या फक्त त्याचा नमूद सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालयात लेखी, हार्ड कॉपी स्वरुपातच दाखल कराव्यात. ठाणे महापालिकेच्या प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या www.thanecity.gov.in या वेबसाईटवर आणि निवडणूक विभाग आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. या मतदार याद्या आगाऊ मागणी नोंदविल्यास नागरी सुविधा केंद्र महापालिका मुख्यालय येथे विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading