महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक प्रभागात सकाळी दहा वाजता एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचं पालिका आयुक्तांचे आवाहन

महात्मा गांधी जयंतीनिमित्त १ ऑक्टोबर रोजी ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमध्ये सकाळी १० वाजता स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ‘स्वच्छता ही सेवा’ हे अनोखे अभियान जाहीर केले आहे. हे अभियान राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यानुसार, रविवार, ०१ ऑक्टोबर रोजी प्रत्येक वॉर्डमध्ये सकाळी १० वाजता स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात येणार आहे.
स्वच्छतेसाठी जे जे करता येईल ते करावे आणि स्वच्छतेसाठी मारक ठरेल ते करू नये हे मध्यवर्ती सूत्र सगळ्यांनी लक्षात ठेवावे, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, उपक्रम समन्वयक यांनी स्वच्छतेसाठी जागा निश्चित करावी. नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाची संख्या लक्षात घ्यावी. लोकप्रतिनिधी, सेवाभावी आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. या उपक्रमामुळे आपण निवडलेल्या जागेत दृश्य स्वरूपात फरक जाणवला पाहिजे अशी पाच सूत्रे आयुक्त बांगर यांनी आखून दिली. सफाई कर्मचाऱ्याने जसे काम करावे अशी आपल्याला अपेक्षा असते तसे काम आपण सगळ्यांनी रविवारी प्रत्यक्ष करूया. श्रमदान मोहीम राबविताना सगळे एकसमान असतील. त्यात कोणी वरिष्ठ किंवा कनिष्ठ असा भेद नसेल. त्याची जाणीव ठेवून सगळे काम करतील, अशी अपेक्षाही आयुक्त बांगर यांनी व्यक्त केली. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या आयोजनाबाबत महापालिकेची तयारी सुरू आहे. या आयोजनात सुसूत्रता राहावी आणि जास्तीत जास्त ठाणेकर नागरिक त्यात सहभागी व्हावेत यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त बांगर यांनी मार्गदर्शन केले. १५ सप्टेंबर ते ०२ऑक्‍टोबरपर्यंत साजरा होणारा स्वच्छता पंधरवडा हा- स्वच्छता ही सेवा २०२३ या उपक्रमाच्या स्वच्छता मोहिमेचा हा भाग आहे. हा पंधरवडा सुरू झाल्यापासून, या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमात आतापर्यंत देशभरात ०५ कोटीहून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading