मलनिस्सारण वाहिनीचे काम करताना महानगर गॅसच्या वाहिनीस धक्का लागल्यामुळे ऐन रविवारचा अनेकांना उपवास

महापालिकेच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महानगर गॅस कंपनीची वाहिनी फुटल्यामुळे ऐन रविवारचा अनेक रहिवाशांना उपवास घडला. नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी या सेवा रस्त्यावर दर्यासागर हॉटेलच्या समोरचा महापालिकेच्या वतीनं मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचं काम सुरू होतं. या रस्त्याखालीच महानगर गॅसची वाहिनी होती. महापालिकेच्या ठेकेदारानं सकाळच्या सुमारास काम करताना निष्काळजीपणामुळे ही गॅसची वाहिनीच तोडली. जेसीबीनं रस्ता तोडत असताना गॅसची वाहिनी तुटल्यामुळं या परिसरात गॅस गळती सुरू झाली. गॅसचा दुर्गंध या परिसरात पसरला. या वाहिनीचा व्हॉल्व्ह सापडत नसल्यामुळे बराच काळ ही गळती सुरू होती. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरात राहणा-या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. ठाणे महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल, महानगर गॅसचे अधिकारी या ठिकाणी पोचले. त्यानंतर दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं. पण संध्याकाळपर्यंत तरी या परिसरातील गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यामुळं अनेकांना ऐन रविवारचा उपवास घडला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading