ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. मात्र आजचा दिवस गेल्यानंतर उद्यापासून पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा प्रकार सुरू राहतो. मराठी भाषा दिन साजरा करण्याबरोबरच प्रत्येक मराठी माणसानं शुध्द मराठीत बोलण्याचा निग्रह करून तो पाळला तरीसुध्दा मराठी भाषेला भरपूर काही साध्य करता येईल. नुसते दिन साजरे करून उत्सवी होण्यापेक्षा मराठी बोलण्याबरोबरच समोरच्यालाही मराठीतूनच संवाद साधण्याची आवश्यकता भासेल तो मराठी भाषेसाठी सुदिन ठरेल. ठाणे महापालिकेच्या वतीनं मराठी राजभाषा दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर टेंभीनाका येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ७ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतर्फे पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरीचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पालखी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.