मनसेच्या अविनाश जाधव यांना अटक – सोमवारपर्यत पोलीस कोठडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जाधव यांना पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावल्यानंतर महापालिकेसमोर आंदोलन करीत असताना खंडणी विरोधी पथकाद्वारे त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांच्यासह दोघा सहकाऱ्यांना सरकारी कामात अडथळा आणणे तसेच सरकारी वास्तुत घुसखोरी केल्याप्रकरणी अटक केली. ठाणे सत्र न्यायालयाने जाधव यांना सोमवारपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलीस ठाण्यातून न्यायालयात नेताना मनसैनिकांनी त्यांच्यावर चक्क फुले उधळली. यावेळी न्यायालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. कोवीड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले होते. यावेळी आंदोलन चिरडण्यासाठी ठाणे खंडणी विरोधी पथकाने जाधव यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कापुरबावडी पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर जाधव यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जाधव आणि दोघां सहकाऱ्यांना सोमवारपर्यत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालयात आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी घोषणाबाजी करीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धार केला. दरम्यान जाधव यांच्या वकीलांनी, न्यायालयात दोन्हीकडुन युक्तीवाद झाल्याचे सांगुन राजकीय आकसापोटी ही कारवाई असुन पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने 353 या कलमाचा गैरवापर केला जात असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले. तसेच सोमवारी न्यायालयीन कोठडीनंतरच जामिनासाठी अपील करणार असल्याचे सांगितले. तर तडीपारीचा विषय वेगळा असून त्या नोटीसीला 4 ऑगस्टपर्यत उत्तर देऊन स्पष्टीकरण दिले जाणार असल्याचेही जाधव यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.
अविनाश जाधव यांना अटक झाल्याने मनसेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात धाव घेत या कारवाईचा धिक्कार केला. मनसेने केलेले आंदोलन म्हणजे कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारी स्वरूपाचा खटला नाही. कोविडसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी जाधव यांनी आंदोलन केले. केवळ आकसापोटी ही कारवाई केल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले. हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा डाव आहे अविनाश जाधव यांनी जे केलं त्याबद्दल आम्हाला अभिमान,आम्ही कुठेही चुकलो नाही, या सरकारच्या मोगलाई विरोधात आता संपूर्ण महाराष्ट्रात लाथ घालू, आणि ही लाथच हे सरकार उलथवून टाकेल, इथल्या मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, सुशांत सिंग सारख्या केसमध्ये इंन्व्हीस्टीगेशन करत नाही, नको तिथे गुन्हे दाखल करता,आयुक्तांना जाब विचारायचं नाही का? आंदोलन करायचे नाही का? असा सवाल यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप देशपांडे यांनी केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading