मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांबरोबरच सहप्रवाशावरही आता कारवाई

मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांबरोबरच आता सहप्रवाशावरही कारवाई होणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी हा इशारा दिला आहे. ठाणे वाहतूक शाखेतर्फे मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांवर २५ डिसेंबर पासून कारवाई सुरू करण्यात आली असून ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरसह विविध ठिकाणी तपासणी नाके उभारून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. मोटार वाहन कायद्यान्वये मद्यपि वाहन चालकच नव्हे तर वाहनातील सहप्रवासी सुध्दा दोषी ठरतात. यामुळं आता त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असून मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असं आवाहन पोलीस उपायुक्तांनी केलं आहे. मोटर वाहन कायद्यानुसार मद्यपि वाहन चालकांना २ हजार रूपये दंड आणि ६ महिने कैद अशी शिक्षा होऊ शकते. या गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास हाच दंड ३ हजार रूपये आणि २ वर्ष कारावासाची शिक्षा आहे. मोटर वाहन कायद्याच्या कलम १८८ मध्ये मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीला वाहन चालवण्यास उद्युक्त केल्याचा ठपका ठेवत सहप्रवाशांवरही कारवाई होऊ शकते या कलमाचा आधार ठाणे पोलीस यंदा घेणार आहेत. त्याचप्रमाणे संचारबंदीमध्ये म्हणजे रात्री ११ नंतर घराबाहेर पडल्यास संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते यासाठी नववर्षात अशी कारवाई टाळण्यासाठी कोणीही रात्री घराबाहेर पडू नये असंही बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास वाहन चालकांच्या कुटुंबियांना फोन करून माहिती देण्याचा विचार पोलीस करत आहेत. विशेषत: तरूण वाहन चालकाच्या विरोधात अशी कारवाई प्राधान्यानं केली जाणार असून प्रसंगी त्याच्या कुटुंबियांना बोलावून वाहन चालकाला त्यांच्या स्वाधीन करण्याबाबतचाही विचार पोलीस करत असल्याचं वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading