मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

जिल्ह्यातील मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु झाला असून या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. पात्र मतदारांनी मतदारयादीत आपले नाव नोंदविण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप (VHA), एनएसव्हीपी व व्होटर पोर्टल या ऑनलाईन सुविधांचा वापर करावा. तसेच प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदारयादीतील आपला तपशिल अचूक आहे का याची खात्री करावी, असे आवाहनही करण्यात आले. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिका- यांनी सविस्तर माहिती दिली. संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी 19 आणि 20 नोव्हेंबर तसंच 3 आणि 4 डिसेंबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मतदारसंघातील मतदान केंद्रावर बीएलओ उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये शहरी आणि निम शहरी भाग मोठ्या प्रमाणावर असल्याने गृहनिर्माण सहकारी संस्थांचे सेक्रेटरी यांना मतदान केंद्र स्तरीय स्वयंसेवक घोषित केलेले आहेत. मतदार नोंदणी वाढविण्यासाठी मोठ्या सोसाट्यांच्या ठिकाणीही विशेष नोंदणी शिबिरासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिनगारे यांनी केले आहे.
वंचित, बेघर, भटक्या, विमुक्त घटकांच्या नोंदणीसाठी विशेष लक्ष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम काळात युवावर्ग, दिव्यांग महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या, विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीयपंथी या घटकांची नोंदणी वाढवी, यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आदिवासी महिलांच्या नोंदणीसाठीही मुरबाड, भिवंडी ग्रामीण, शहापूर येथे विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत वय वर्षे 18-19 वयोगटातील मतदार, तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि दिव्यांग मतदारांनी सहभागी होऊन आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करून घ्यावे. याकरिता मतदारांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जाऊन मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 चे अर्ज भरुन द्यावे किंवा एनएसव्हीपी, व्हीएचए व व्हीपोर्टल या पोर्टलवर लॉग-इन करुन आपले नाव समाविष्ट करण्याबाबत ऑनलाईन अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात आलं आहे. मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, नविन नोंदणी तसेच मतदार यादतील नोंदणीस आधार क्रमांक जोडणी इत्यादी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्यात, याकरिता उद्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसेभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात मतदार नोंदणी वाढावी, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading