भंडार्ली डम्पिंग ग्राउंड ३० संप्टेंबर पर्यंत बंद न केल्यास माजी जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील यांचा २ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा

तालुक्यातील चौदा गावातील भंडार्ली डम्पिंग हटवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे चौदा गावातील नागरिकांनी भंडार्ली डम्पिंग हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या ३० संप्टेंबर पर्यंत डम्पिंग ग्राउंड बंद न केल्यास माजी जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील यांनी २ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील जिल्हापरिषद खोणी गटातील भंडार्ली, गाव हे ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये येत नसताना संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कचरा भंडार्ली येथे गेल्या वर्षभरापासून टाकण्यात येत आहे. मार्च २०२२ मध्ये त्यावेळचे पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेमध्ये भंडार्ली डम्पिंग बाबत बैठक झाली. त्यावेळी आमदार राजू पाटील आणि माजी आमदार सुभाष भोईर आणि १४ गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्या समवेत चर्चा होवून ११ महिन्यासाठी भाडे तत्वावर ठाणे महापालिकेचा कचरा भंडार्ली डम्पिंगला टाकला जाईल असे सांगितले होते. त्याला लोकप्रतिनिधींसह १४ गावातील नागरिकांनी इच्छा नसताना होकार दर्शविला. त्यावेळी ११ महिन्यांचा करार संपल्यावर त्वरित भंडार्ली डम्पिंग बंद केला जाईल असे सांगितले होते. त्याची समाप्तीची तारीख फेब्रुवारी २०२३ मध्ये होती. त्यानंतर भंडार्ली डम्पिंग बंद होणे गरजेचे होते पण ते चालूच राहिले. भंडार्ली ग्रामस्थांसह संपूर्ण १४ गावातील नागरिकांचा भंडार्ली डम्पिंगला प्रथम पासूनच विरोध होता. परंतु पालकमंत्री म्हणून एक वर्षाचाच करार असल्याचे विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे आणि स्थानिक आमदार राजू पाटील यांच्या शब्दाला मान देत एक वर्षाकरिता डम्पिंगला होकार दर्शविला. परंतु सध्या १४ गावांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. डम्पिंगमुळे १४ गावांमध्ये आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील खाडी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. ठाणे महापालिकेचा कचरा १४ गावांच्या माथी मारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे असे दिसून येत असल्याची भावना १४ गावातील नागरिकांची झाली आहे.
परंतु आता ३० सप्टेंबर ही भंडार्ली डम्पिंग बंद करण्याची अंतिम तारीख देण्यात आली असून त्यापुढे एक दिवसही डम्पिंग वर कचरा टाकू दिला जाणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी. तसे झाल्यास एक जागरूक नागरिक म्हणून भंडार्ली डम्पिंग कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ०२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त लोकशाही मार्गाने भंडार्ली नाका येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील यांनी दिला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading