बिबळ्याला पकडण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाची दृश्य टिपणा-या छायाचित्रकारांना पोलीस आणि वन विभागाकडून धक्काबुक्की

भरवस्तीत शिरलेल्या बिबळ्याला पकडण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाची दृश्य टिपणा-या छायाचित्रकारांना काल पोलीस आणि वन विभागाकडून धक्काबुक्की होण्याचा प्रकार घडला. कोरम मॉलमध्ये शिरलेला बिबळ्या फिरत फिरत सत्कार रेसिडेन्सी हॉटेलच्या तळघरात लपून बसला. त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच बिबळ्याचं वृत्त सर्वत्र पसरल्यानं बघ्यांची गर्दी झाली होती. महत्प्रयत्नांनंतर बिबळ्याला गुंगीचं इंजेक्शन देण्यात वन विभागाला यश आलं. वन विभागाचे बिबळ्याला पकडण्यासाठी चाललेले प्रयत्न पाहण्यासाठी हौशे-गवशे-नौशांची गर्दी जमली होती. राजकीय नेते, कार्यकर्ते याचबरोबर छायाचित्रकारही बिबळ्याची छबी टिपण्यासाठी प्रयत्नशील होते. जवळपास ६ तास तहानभूक हरपून बिबळ्या टिपण्यासाठी प्रयत्न करणा-या छायाचित्रकारांना वन विभाग आणि पोलीसांच्या अरेरावीला सामोरं जावं लागलं. बिबळ्याचं एक छायाचित्र मिळावं यासाठी छायाचित्रकार प्रयत्न करत होते. बिबळ्या बेशुध्द झाल्यानंतर त्याला वन विभागाचे अधिकारी पिंज-यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना छायाचित्रकार आणि बघ्यांची गर्दी जमली. ही गर्दी हटवत असतानाच छायाचित्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली. बिबळ्याला वन विभागाचे अधिकारी झाकून पिंज-यात आणत होते तर एकतरी छायाचित्र घेऊ द्यावं असं छायाचित्रकारांचं म्हणणं होतं. यातूनच गोंधळ सुरू झाला आणि सामनाचे छायाचित्रकार संजय देवकर यांच्यासह इतर काही छायाचित्रकारांना पोलीसांच्याही रोषाला सामोरं जावं लागलं. पालकमंत्र्यांसमोरच पोलीसांचा हा प्रकार सुरू होता. त्याचवेळी सामनाचे देवकर यांना पोलीसांनी पकडून धक्काबुक्की केली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांना पत्रकारांना या गोंधळातून बाहेर काढण्यास सांगितलं. प्रताप सरनाईक यांच्यासमोरही वन विभागाचे अधिकारी हा प्रकार करत असल्यामुळं प्रताप सरनाईकही वन विभागाच्या अधिका-यांवर संतापले होते. अखेर ब-याच प्रयत्नानंतर हा सर्व गोंधळ शांत झाला. वन आणि पोलीसांच्या या प्रकाराबाबत पत्रकारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading