‘बिट्टू बॉस’ची आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली भेट

साधारण दोन वर्षांपूर्वी ठाण्यातील येऊर जंगलाच्या परिसरात रस्त्यावर बिबट्याचे पिल्लू आढळून आले होते , त्याची त्याच्या आईपासून ताटातूट झाली होती. स्थानिक नगरसेविका परिषा सरनाईक यांनी वन खात्याला बोलावून या बिबट्याला ‘जीवदान’ दिले. त्या बिबट्याला बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे नेण्यात आले आणि त्याचे पालकत्व शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वीकारले होते. त्यावेळी हा विषय खूप चर्चिला गेला होता. ज्यावेळी हे बिबट्याचे पिल्लू मिळून आले होते तेव्हा त्याचे वजन अवघे ३०० ग्रॅम इतके होते. त्याची त्यानंतर घरातील स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेऊन संगोपन करण्यास सुरुवात झाली.

साधारण २०१९ च्या वर्ष अखेरीस ठाण्यातील शिवसेनेच्या नगरविका परिषा सरनाईक या सकाळी येऊरच्या जंगल परिसरात मॉर्निंग वॉक करीत असताना त्याठिकाणी जंगल परिसरात रस्त्याच्या जवळ एक प्राण्याचे पिल्लू असल्याचे त्यांना समजले. सुरुवातीला हे मांजरीचे पिल्लू असावे असे वाटले नंतर ते बिबट्याचे पिल्लू असल्याचे स्पष्ट झाले. सरनाईक यांनी वन विभागाशी चर्चा करून या बिबट्याच्या पिल्लूला बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्याचा निर्णय घेतला. हे बिबट्याचे पिल्लू व त्याची आई यांची ताटातूट झाली होती. त्यामुळे या बिबट्याच्या पिल्लाला पुन्हा येऊर येथे जिथे तो मिळून आला तेथे २-३ दिवस नेऊन ठेवण्यात आले. या बिबट्याची आई आणि त्याचे पुनर्मीलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याची आई मिळाली नाही त्यामुळे पुन्हा हे बिबट्याचे पिल्लू संजय गांधी उद्यानात आणण्यात आले आणि त्याला दत्तक घेण्याचा निर्णय आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला. दत्तक घेताना या बिबट्याच्या पिल्लूला ‘बिट्टू बॉस’ हे नाव देण्यात आले. आमदार सरनाईक यांचे चिरंजीव पूर्वेश यांना घरात ‘बिट्टू’ हे टोपण नाव आहे. या बिबट्याच्या पिल्लाच्या रूपाने सरनाईक परिवारातच एक नवा सदस्य आला या भावनेने त्याचे नाव ‘बिट्टू बॉस’ असे ठेवण्यात आले. पूर्वेश सरनाईक यांनी या ‘बिट्टू बॉस’ ची कायम काळजी घ्यायची अशी जबाबदारीच आ. सरनाईक यांनी पूर्वेश यांच्यावर पहिल्या दिवसापासून सोपवली होती. आणि पूर्वेश ही जबाबदारी नीट पार पाडत आहेत.

जेव्हा हे बिबट्याचे पिल्लू मिळाले तेव्हा थंडीचे दिवस होते आणि त्यात या पिल्लाला थंडीचा त्रास होत होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डॉक्टर शैलेश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथकाने या बिबट्याच्या पिल्लाची म्हणजेच ‘बिट्टू बॉस’ची  विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली. या पिल्लाला सुरुवातीला दूध ही पिता येत न्हवते, त्याला वन्य कर्मचाऱ्यांनी दूध प्यायला शिकवले. पुढे दुधानंतर चिकन सूप देण्यास सुरुवात झाली. हळू हळू त्याच्या आहारात वाढ करण्यात आली.  या बिबट्याच्या पिल्लाला वन कर्मचाऱ्यांनी खूप जीव लावला , रात्र दिवस वन कर्मचाऱ्यांनी मेहनत केली , बचाव पथकाने मोठे काम केले , स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेतली आणि त्याला वाढवले. या सर्व दिवसात ‘बिट्टू बॉस’ काय खात आहे, त्याची वाढ कशी होत आहे यावर आमदार सरनाईक हे स्वतः बारीक लक्ष ठेऊन होते , कारण त्यांनी बिट्टू बॉसचे पालकत्व स्वीकारले होते. आता ‘बिट्टू बॉस’ २ वर्षांचा झालाय हे पाहताना त्यांना मनस्वी आनंद होतो.

सरकारच्या ‘वन्यजीव दत्तक योजना’ अंतर्गत या बिबट्याला आमदार प्रताप सरनाईक यांनी दत्तक घेतले आणि ‘बिट्टू बॉस’ असे त्याचे नामकरण केले. त्याचा पालन पोषण करण्याचा वार्षिक जो काही खर्च आहे तो दत्तक घेणारा व्यक्ती करतो. ज्या वन्य प्राण्याला आपण दत्तक घेतले आहे त्याला बघण्याची किंवा त्याची विचारपूस करण्यासाठी दत्तक घेणारा पालक १५ दिवसातून एकदा उद्यानात येऊ शकतो, त्या प्राण्याला भेटू शकतो. त्यामुळे या बिबट्याच्या पिल्लाला जेव्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले तेव्हा संपूर्ण सरनाईक कुटुंब तिथे गेले होते.अधूनमधून मी ‘बिट्टू बॉस’ला येऊन बघत असतो , भेटत असतो असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading