बारवी धरणातील वाढलेल्या पाणी साठ्याची जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित मागणी करणार

ठाणे जिल्हयाला पाणी पुरवठा करणाऱया बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्यामुळे या धरणातील पाणी साठविण्याची क्षमता देखील वाढली आहे. जिह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा वाढलेला पाणी साठा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावा यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रितरित्या एमआयडीसीकडे मागणी करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्यासमवेत झालेल्या बैठकीदरम्यान घेण्यात आला. या बैठकीत बारवी धरणाची उंची वाढविण्याबाबत आसपासच्या महानगरपालिकांनी स्विकारावयाचे धोरण याबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली. बारवी धरणाचे पाणी ज्या महानगरपालिका आणि नगरपालिका ज्या प्रमाणात घेतील त्यांनी त्या प्रमाणात धरणाची उंची वाढविण्याकामी जे विस्थापित झाले आहेत त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेवून शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करावी असेही या बैठकीत ठरविण्यात आले. ठाणे जिह्यातील शाई/ काळू धरणांबाबत अंदाजे 24 हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. त्यातील 10 टक्के वाटा हा ठाणे जिल्हयातील महानगरपालिका आणि नगरपालिका सर्वानी एकत्रित करावयाचा असून यासाठी या धरणांच्या तांत्रिक, आर्थिक तसेच भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करण्या बाबत यावेळी चर्चा करण्यात आली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सीएनडी वेस्ट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कचऱयापासून विटा व ब्लॉक्स तयार करण्यात येत असल्यामुळे काँक्रिट, माती व रॉबिटचे प्रमाण कमी झाले आहे. या प्रकल्पासाठी इतर महापालिका आणि नगरपालिकांनी त्यांचेकडील सीएनडी वेस्ट या प्रकल्पासाठी पाठविल्यास सीएनडी वेस्टच्या प्रमाणात येणारा खर्च संबंधित महानगरपालिका आणि नगरपालिकांनी करावयाचा असून त्यांचे स्तरावर महानगरपालिका तसेच नगरपालिकांनी प्रशासकीय कार्यवाही करावी असेही यावेळी ठरविण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading