प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट देणारी पाणीपट्‌टी कर अभय योजना जाहीर

ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणीपट्टी बिलामधील प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट देणारी पाणीपट्‌टी कर अभय योजना जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. थकीत पाणीपट्टी बिलावर 100 टक्के इतकी भरीव सवलत जाहिर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. डिसेंबर 2022 ते 31 मार्च 2023 या चार महिन्यांच्या कालावधीत या अभय योजनेचा लाभ पाणीपट्टी थकबाकीदारांना घेता येणार आहे. 31 मार्च पर्यंतच्या थकीत पाणीपट्टी कराच्या दंडाची रक्कम पूर्णत: माफ करुन भरीव सूट देणारी थकबाकीदारांसाठी लाभदायी अशी ही योजना आहे. ही रक्कम थकबाकीदारांनी एकाच वेळी भरणा करावयाची असून ती टप्याटप्यांनी भरता येणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे जाहीर केलेल्या अभय योजनेच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे 31 मार्चपर्यंत नागरिकांनी थकीत रक्कम भरणा करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती संयोजनधारकांनी पाणीपट्टी जमा केली असेल, अशा घरगुती नळसंयोजन धारकांना ही योजना लागू असणार नाही तसेच व्यावसायिक नळसंयोजन धारकांनाही ही सवलत लागू असणार नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षात मीटर पद्धतीने 72 हजार 120 तसेच नॉन मीटर पद्धतीने 1 लाख 53 हजार 295 असे एकूण 2 लाख 25 हजार 415 इतक्या संयोजनधारकांना पाणी देयके आकारण्यात आली आहेत. यामध्ये 95 कोटी रूपये इतकी थकबाकी असून त्यावर रुपये 38 कोटी इतका प्रशासकीय दंड आकारण्यात आला आहे. पाणी देयके वसुलीपोटी विभागामार्फत आतापर्यत 4 हजार 316 इतकी नळसंयोजने खंडीत केली असून 97 मोटर / पंप रुम्स सील करण्यात आले आहेत. अशा प्रकारची आणि यापेक्षा कठोर कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी देयकाचा भरणा त्वरीत करुन महापालिकेस सहकार्य करावे आणि प्रशासकीय दंड माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी पाणीपट्टी बिलाची देयके महापालिकेच्या संबंधित प्रभाग समिती कार्यालयात जमा करावीत. तसेच नॉन मीटर पद्धतीच्या पाणी देयकांसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading