पुत्र मोहापायी शिवसेनेला उध्वस्त करण्याचं काम उध्दव ठाकरे यांनी केलं – चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

आपण आणि आपला पुत्र या मोहापायी उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेला उध्वस्त करण्याचं काम केलं असा स्पष्ट आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात बोलताना केला. बावनकुळे हे जिल्ह्याच्या दौ-यावर आले असताना माध्यम संवाद अंतर्गत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी धोकाबाजी केली. निवडणुकीच्या ६ महिन्यापूर्वीच या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर ठाकरे यांची बैठक झाली होती आणि त्यामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत निवडणूक लढवा आम्ही आमची निवडणूक लढतो आणि नंतर आपण एकत्र येऊ असं ठरलं होतं. शरद पवार यांच्या सापळ्यात ठाकरे अडकले. हे करताना त्यांनी कार्यकर्ते, स्थानिक राजकारण अशा कशाचाच विचार न करता विचाराला तिलांजली देऊन शिवसेनेला उध्वस्त करण्याचं काम उध्दव ठाकरे यांनी केलं असं बावनकुळे यांनी सांगितलं. पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उध्दव ठाकरे यांची सेना यांच्या नेत्यांच्या पक्षीय प्रवेशाचे मोठमोठे बॉम्बस्फोट झाल्याचे दिसतील असं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशी परिस्थिती येईल की महाराष्ट्र विकास आघाडीला निवडणूक लढवण्यासाठी काही ठिकाणी उमेदवारही मिळणार नाहीत असं भाकीत बावनकुळे यांनी यावेळी केलं. आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाबरोबर युती होईल आणि जिथे जिथे त्यांना आवश्यकता असेल तिथे तिथे भारतीय जनता पक्षाची पूर्ण ताकद उभी केली जाईल असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading