पालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांसह सहायक आयुक्तांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मनोहर डुंबरेंची मागणी

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांसह प्रभाग समितीतील सहायक आयुक्त, त्यांचे निकटचे नातेवाईक यांच्या संपत्तीची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करावी. तसेच शहरात पाच वर्षांत झालेल्या अतिक्रमणासंदर्भात उपायुक्त (अतिक्रमण), सहायक आयुक्त आणि भूमाफिया यांच्या संबंधांची चौकशी करण्यासाठी प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. ठाणे महापालिका हद्दीत गेल्या पाच वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली. विशेषत: लॉकडाऊनच्या काळात हजारो अनधिकृत बांधकामे झाली. या संदर्भात वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतरही कारवाई करण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केली गेली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जुजबी कारवाई केली जात असल्याचे आढळले आहे, याकडे गटनेते मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे.
गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामांवरून ठाणे महापालिकेतील प्रशासनातील काही अधिकारी, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त, सहायक आयुक्त आणि भूमाफिया यांच्यात आर्थिक संबंध निर्माण झाल्याचा संशय आहे. त्यातून प्रभाग समितीत कार्यरत सहायक आयुक्तांकडून सर्रासपणे अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींकडे डोळेझाक करण्यात आली. सतर्क नागरीकांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी प्रचंड संपत्ती जमा केल्याचा संशय आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या काळात महापालिका उपायुक्त (अतिक्रमण), प्रभाग समितीचे सहायक आयुक्त यांच्या संपत्तीची चौकशी करावी. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांचे जवळचे नातेवाईक, नातेवाईकांच्या उत्पन्नाचा स्त्रोत व त्यांच्या नावावरील मालमत्ता यांचाही तपशील जमा करावा, अशी मागणी डुंबरे यांनी केली आहे.
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराची राज्य सरकारने नंदलाल आयोगामार्फत चौकशी केली होती. त्याचधर्तीवर प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ठाणे महापालिकेतील उपायुक्त (अतिक्रमण), सहायक आयुक्त आणि भूमाफियांच्या आर्थिक संबंधांची चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार बाहेर निघेल, असे भाकीत मनोहर डुंबरे यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading