पाण्यासाठी सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगरातील महिला आक्रमक – महापालिका मुख्यालयासमोर फोडली मडकी

सावरकर नगर, करवालो नगर आणि लोकमान्य नगर परिसरातील महिलांनी पाण्याच्या अपु-या पाणी पुरवठ्यामुळे आज महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. या परिसराला गेल्या ५ वर्षांपासून अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. त्याचे संतप्त पडसाद आज उमटले. या मोर्चेकरी महिलांनी यावेळी ठाणे पालिका मुख्यालयासमोरच मडकी फोडून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महापालिका अधिकार्‍यांनी दीड महिन्यात पाणीप्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगर या भागामध्ये साधारणपणे 50 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या वास्तव्यास असून केवळ 2 दशलक्ष लिटर्सची एकच पाण्याची टाकी पालिकेच्या वतीने बांधण्यात आली आहे. अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले पाणी वितरणाचे जाळेही नव्याने विस्तारण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागात पाण्याची मोठी टंचाई भेडसावत आहे. कमी क्षमतेची पाण्याची टाकी असून ती नादुरुस्त असल्याने अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी आपल्या रोजगारावर जाणेही दुरापास्त झाले आहे. त्यामुळे आज संतप्त महिलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी ‘हंडा मोर्चा’ काढला होता. लोकमान्य नगर बसडेपो पासून रणरणत्या उन्हात मोर्चेकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करीत मुख्यालय गाठले. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याचे कारण सुरक्षा अधिकार्‍यांनी दिल्यानंतर संतापलेल्या मोर्चेकर्‍यांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठाण मांडले. अखेर पाणीखात्याचे कार्यकारी अभियंता ढोले यांनी प्रवेशद्वारावर येऊन मोर्चेकर्‍यांची भेट घेतली. सावरकर नगर, करवालो नगर, लोकमान्य नगर या भागात पाणी सोडण्याची वेळ निश्चित करावी, पाणीपुरवठ्यामध्ये वाढ करावी, पाणी समस्या निकाली काढण्यासाठी आणखी जलकुंभ उभारण्यात यावेत, पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यात यावी, स्वतंत्र जल वितरण यंत्रणा विकसीत करुन वॉटर सप्लायचे रिमॉडेलिंग करावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. त्यावर ही समस्या निकाली काढण्यासाठी दीड महिन्यात उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन ढोले यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading