दलित पँथरचा केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार

केंद्र सरकारला महागाईचा हा वणवा पसरवून देशात अराजकता निर्माण करायची आहे. त्यामुळेच केंद्र देशात कृत्रिम महागाई निर्माण करीत आहे. जनतेच्या ताटात भाकरी देण्याऐवजी धार्मिकवादाचे रक्त वाढत आहे. त्यासाठीच महागाईच्या वणव्याला मुद्दामहून हवा देण्याचे काम केले जात आहे. असा आरोप करत दलित पँथरने केंद्र सरकारच्या विरोधात महागाईचा एल्गार पुकारला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
कृषिप्रधान देशात फक्त कर्जबाजारी शेतकरीच आत्महत्या करताहेत असे नाही, तर महागाईमुळे आता सामान्य नागरिक सुध्दा असे करू लागले आहेत. जेव्हापासून केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे तेव्हापासून देशात महागाईचा राक्षस मोकाट झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. देशात भाकरी पेक्षा धार्मिकतेला महत्व आले आहे. भाजीपाला, अन्नधान्य, औषधे, शैक्षणिक साहित्य असे मानवाला आवश्यक असलेले सारे साहित्य कमालीचे महाग झाले आहे. त्यामुळे लोकांनी जगायचे कसे? असा सवाल उपस्थित करीत दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी केंद्र सरकारचा महागाईच्या विरोधातील एल्गार मोर्चा काढून निषेध केला. ही महागाई वाढली नसून वाढविण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रात सरकारमध्ये असलेल्या मोदी – शहा जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी हा देश अंबानी – अदानीच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच देशासमोर मोठी आर्थिक टंचाई निर्माण झाली असताना अंबानी आणि अदानींची श्रीमंती वाढतेच कशी? हे मोठे षडयंत्र आहे. मोदी – शहा यांनी देशातील ही कृत्रिम महागाई नियंत्रणात आणली नाही तर त्यांचीही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सारखी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मोदी – शहा ‘ होश में आओ ‘ असा घणाघात तायडे यांनी केला. कोर्ट नाका येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दलित पँथरचे मोर्चकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजून आणि गळ्यात भाज्यांच्या माळा घालून महागाईला नियंत्रित न ठेवल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. मोर्चेकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व मागण्या केंद्रापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading