पाऊस आणि सणासुदीच्या दिवसात आरोग्याची काळजी घेण्याचं महापालिकेचं आवाहन

ठाणे महापालिका क्षेत्रात सध्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी पावसाळयात तसेच सणासुदीच्या काळात कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे. सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठविलेल्या किंवा साचलेल्या पाण्यात, धुणी-भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम्स, घराच्या आसपास पडलेल्या नारळयाच्या करवंटया, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौद, हवाबंद झाकण नसलेले हौसिंग सोसायटयांचे ओव्हरहेड टँक्स आदींमध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी गाळून, उकळून प्यावे, पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरिन वापरावे, इमारतीमधील आणि घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, सध्या येणाऱ्या सणासुदीच्या काळात शिळे, उघडयावरील अन्नपदार्थ, कापलेली फळे खाऊ नयेत, साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, सात दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेऊ नये, साठविलेल्या पाण्याच्या ड्रम्सवर घट्ट झाकण बसवावे, सोसायटीच्या आवारात, टेरेसवर किंवा घराभोवती नारळाच्या करवंटया, वाहनांचे टायर्स, रिकामे डबे असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच सेप्टीक टँक त्वरीत दुरुस्त करुन घेवून सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवावा. दरम्यान या दिवसात ताप किंवा इतर कोणत्याही आजाराची लागण झाल्यास लगेचच नजीकच्या महापालिकेच्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी तसेच स्वतःच्या घरातील अगर आजुबाजूची व्यक्ती हिवताप, डेंग्यू फिव्हर, कावीळ, हगवण, विषमज्वर, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या रोगांनी आजरी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती त्वरीत महापालिकेच्या दवाखान्यात अथवा आरोग्य विभाग मुख्य कार्यालयात देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading