पंचायत समिती स्तरावर ५० बेडचे विलगीकरणं कक्ष तयार करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांचे आदेश

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक पंचायत समिती स्तरावर किमान ५० बेड असणारा विलगीकरणं कक्ष तयार करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी गट विकास अधिका-यांना दिले आहेत. त्यांनी काल दृकश्राव्य माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणाची आढावा बैठक घेतली.
सध्याच्या घडीला ठाणे ग्रामीणमध्ये एकही कोराना बाधीत रुग्ण नाही. मात्र पुढील पंधरा दिवस जोखमीचे असून खबरदारी म्हणून प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांकडून विलगीकरणासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी सर्व सोयीसुविधा युक्त ५० बेडचे विलगीकरणं कक्ष उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रत्येक पंचायत समितीला प्रत्येकी १ किंवा २ लाखाचा निधी वितरित केला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत मार्फ़त युद्ध पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात पसरू नये यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.
कोरोनामुळे संचारबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक मजूर, कामगार, दिव्यांग नागरिक, निराधार, हातावर पोट असणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांची उपासमार होणार नाही याची काटेकोर दक्षता घेऊन असे नागरिक आढळल्यास तात्काळ त्यांना स्थानिक प्रशासन, दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातून त्यांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करा असे निर्देश देत सोनवणे यांनी याकाळात दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असेही आवाहन केले.
मुरबाड आणि शहापूर येथे निवारा केंद्र सुरू करण्यात आली आहेत त्याठिकाणी परराज्यातील तसेच इतरत्र जिल्ह्यातील मजूर, कामगार, नागरिक आहेत, त्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुरबाड मध्ये नगरपंचायत आणि ग्रामीण कार्यक्षेत्र धरून ५ ठिकाणी निवारा केंद्र असून त्याठिकाणी १४६ जणांची सोय करण्यात आली आहे.तर शहापूर मध्ये दोन ठिकाणी निवारा केंद्र असून त्याठिकाणी ७८ जण आहेत. या सगळ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहे.
या काळात प्रत्येकाने सतर्क राहायला हवे, मास्कचा वापर हा अनिवार्य असून कार्यालयात देखिल मास्क वापरूनच काम करावे अशा सूचना हिरालाल सोनावणे यांनी दिल्या. तसेच जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या आदेश, सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading