ठाणे शहरात प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरुग्ण विभाग सुरु

ठाणे शहरात कोरोना कोव्हीड -१९ या विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी आणि रुग्णांची तात्काळ तपासणी करणे सोयीस्कर व्हावे यासाठी ठाणे शहरामध्ये प्रभाग समितीनिहाय 15 महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये तर 5 खासगी रूग्णालये अशा एकूण 20 ठिकाणी ताप बाहयरुग्ण विभाग सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. या बाह्यरूग्ण विभागामध्ये केवळ ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होणे याप्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीच तपासणी करण्यात येणार आहे. ठाणे शहरात कोरोना कोव्हीड – १९ या आजाराच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही विशेष सुविधा निर्माण करण्यात आली आहे. याबाबत महापौर नरेश गणपत म्हस्के यांनीही पाठपुरवठा केला होता.
प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरुग्ण विभागात महापालिकेच्या 15 आरोग्य केंद्राचा समावेश आहे. यामध्ये कौसा आरोग्य केंद्र, दिवा केंद्र, कळवा आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, किसननगर आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र, नौपाडा आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, काजुवाडी आरोग्य केंद्र, कोपरी आरोग्य केंद्र, रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, गांधीनगर आरोग्य केंद्र, शिळ आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरस आरोग्य केंद्र, आतकोनेश्वरनगर आरोग्य केंद्र या महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचा समावेश आहे तर कौशल्या हॉस्पीटल, ठाणे ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पीटल, ठाणे वेदांत हॉस्पीटल, जितो एज्युकेशनल अॅन्ड मेडिकल ट्रस्ट या 5 खाजगी हॉस्पिटलमध्ये ताप बाह्यरूग्ण तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
ताप बाहयरुग्ण विभाग सुरू केलेल्या आरोग्य केंद्रांमधील जनरल ओपीडी पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येणार असून हा विभाग सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत कार्यान्वित राहणार आहेत. तसेच महापालिका दवाखान्यांमध्ये अँटीरेबिज उपचार आणि आरोग्य केंद्रातील इतर लसीकरणासाठी आदी उपचार दुपारी २ नंतर सुरु ठेवण्यात येणार आहेत. ताप बाहयरुग्ण विभागाकरीता कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करण्यात येणार नसून याठिकाणी केवळ ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे याप्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या केंद्रातील रुग्णांचे कमी स्वरूपाची लक्षणे, मध्यम स्वरूपाची लक्षणे आणि अतिशय तीव्र स्वरूपाची लक्षणे असणारे रूग्ण तीन विभागामध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे.
ज्या रुग्णांची कोविड तपासणी करणे आवश्यक आहे अशा रुग्णांना भाईंदरपाडा येथील कोरोना केअर सेंटर येथे अॅम्ब्युलन्सव्दारे पाठविण्यात येईल.यातील रुग्ण कोविड पॉझिटीव्ह आढळल्यास त्यांना पुढील उपराचारार्थ सिव्हील हॉस्पिटल ठाणे किंवा होरायझोन प्राईम हॉस्पिटल, पातलीपाडा येथे प्राधिकृत कोविड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येईल. कॅटॅगरी २ आणि ३ मधील रुग्णांना पुढील उपचारासाठी त्यांच्या क्षमतेनुसार बेथणी हॉस्पिटल, पोखरण २ किंवा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे संदर्भित करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading