नेदरलँडच्या कंपनीनं दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये ठाण्यातील शाळांचा समावेश

नेदरलँडच्या कंपनीनं राज्यातील दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये ठाण्यातील शाळांचा समावेश आहे. या कंपनीच्या शिष्टमंडळानं महापालिकेच्या शाळा क्रमांक ९७ ला भेट दिली. महापालिकेच्या तीन शाळा कॅपजेमिनी या नेदरलँडमधील कंपनीनं दत्तक घेतल्या आहेत. या कंपनीच्या शिष्टमंडळानं शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली. विद्यार्थ्यांसमवेत वर्गात बसून त्यांनी माहिती घेतली. येत्या काळामध्ये या शाळांमध्ये सोलर सिस्टीम बसवण्याबरोबरच शाळा अत्याधुनिक करण्याचा मानस या शिष्टमंडळानं व्यक्त केला आहे. सोलर सिस्टीम बसवल्यामुळे शाळेत वीजेची बचत होणार आहे. महापालिका शाळेतील विदयार्थी हे विविध आर्थिक स्तरावरून आलेले असतात. त्यांनाही आधुनिक शिक्षण मिळावं म्हणून या कंपनीतर्फे महापालिकेची शाळा क्रमांक ९७ दत्तक घेऊन ती पूर्णत: सौरउर्जेवर चालवली जाणार आहे. शाळेतील अभ्यासक्रम अत्याधुनिक पध्दतीने शिकता येईल यावर भर दिला जाणार आहे. या कंपनीने गेल्या काही वर्षांपासून या शाळेवर काम करण्यास सुरूवात केली आहे. शाळेमध्ये डिजीटल बोर्ड, मुलांना सोप्या भाषेत समजेल अशा आज्ञावली शाळेत शिकवण्यास सुरूवात झाली आहे. हे पाहण्यासाठी या कंपनीतर्फे एक शिष्टमंडळ शाळेत आलं होतं. त्यावेळी मुलांनी लेझिम पथकाद्वारे पारंपरिक पध्दतीने या पाहुण्यांचं स्वागत केलं. या शाळेत मुलांनी केलेले प्रयोगही या पाहुण्यांनी बघितले. शाळेत एकूण १७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये ई-लर्निंग, कॉम्प्युटर लॅब आणि इतर अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांची अभ्यासाप्रती गोडी वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही वाढ झाली आहे. या शाळेबरोबरच ओवळा आणि मुंब्र्यातील शाळाही या कंपनीने दत्तक घेतल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading