नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धा यंदा ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला

राज्यभरातील महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी, पाच दशकांची समृद्ध परंपरा असलेली ठाणे येथील नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धा यंदा ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या काळात होणार आहे. श्री समर्थ सेवक मंडळ या संस्थेतर्फे नी. गो. पंडितराव या बहुआयामी शिक्षकाच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेचे यंदाचे ५५ वे वर्ष आहे. नियोजित विषय आणि आयत्या वेळचा विषय अशा दोन भागात ही स्पर्धा होते. पदवी गटासाठी नियोजित वक्तृत्वाकरता, बदलते राजकारण बदलती लोकशाही, कृत्रिम बुद्धिमत्ता – नवी क्षितीजे नवी आव्हाने, स्टार्ट अप- उद्योग जगताची नवी भाषा, जी. ए. कुलकर्णींच्या साहित्याचा रमलखुणा, समान नागरी कायदा – माझ्या नजरेतून हे विषय आहेत. तर, कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी सायबर फसवणूक तुमची-आमची, चांद्रयान : अंतराळातील उत्तुंग झेप, मराठी असे आमुची मायबोली पण, डोंगर कोसळतोय, ना.धों. महानोर – एक मनस्वी रानकवी हे विषय आहेत. प्रथम क्रमांकास ६ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये, तृतीय क्रमांकास २ हजार रुपये तर उत्तेजनार्थ १ हजार रुपये अशी पारितोषिके आहेत. प्रत्येक गटात एका महाविद्यालयास पाच विद्यार्थी पाठवता येतील. दोन्ही प्रकारच्या वक्तृत्वात भाग घेणाऱ्या स्पर्धकांचाच पारितोषिकांसाठी विचार केला जाईल. बाहेरगावच्या स्पर्धकांना विनामूल्य निवासव्यवस्था आणि एक वेळचा प्रवास खर्च देण्यात येईल. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी श्री समर्थ सेवक मंडळ यांच्याशी ९९८७९०६२०६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्पर्धा समितीने केले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading