निर्वासितांच्या176 एकर शेतजमिनीच्या सातबारावर बिल्डरचे नाव – शेकडो शेतकरी गुरूवारपासून उपोषणाला बसणार

निर्वासितांसाठी संरक्षित असलेल्या शेतजमिनी खासगी व्यक्तीस ताब्यात घेता येत नसतानाही कल्याण तालुक्यातील हेदूटणे या गावातील जमिनीवर बिल्डरकडून ताबा घेतला जात आहे. शिवाय सातबारामध्येही बदल करण्यात आले आहेत. त्या निषेधार्थ या गावातील 20 वयोवृद्धांसह शेकडो शेतकरी येत्या गुरूवारपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. हेदूटणे येथे सुमारे 176 एकर शेतजमीन आहे. या शेतजमीनीवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावकरी भातशेती करीत आहेत. स्वातंत्र्यानंतर ही जमीन शेतकर्‍यांसाठी संरक्षित केलेली असल्याने  या जमिनीवर खासगी व्यक्ती मालकी हक्क सांगू शकत नाही. मात्र लोढा बिल्डर्सने  ही जमिन ताब्यात घेण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करुन आपले नाव सातबारावर नोंद करुन घेतले आहे असा आरोप राजाराम पाटील यांनी केला. शेतजमिनीवर गावक-यांची नावं कायम असताना आणि  50 वर्षापूर्वीचे निर्वासित दाखले असतानाही शासकीय यंत्रणांना हाताशी धरून लोढा डेव्हलपर्सचे मालक राजेंद्र लोढा यांचे नावे ही जमिन करण्यात आली आहे. त्यानंतर याच जमिनीच्या सातबार्‍यावर पलावा डेव्हलपर्स आणि आता मेक्रोटेक डेव्हलपर्स यांची नावे नोंदविण्यात आली आहेत. मूळ शेतकर्‍यांना/ कुळांना त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून दूर करण्याचा प्रयत्न  राजेंद्र लोढा, पलावा डेव्हलपर्स आणि मेक्रोटेक डेव्हलपर्स यांनी सुरू केलाय आहे. कूळकायद्यानुसार 1953 साली निर्वासित कुळांना प्रदान करण्यात आले. परिणामी या शेतजमिनीची विक्री/खरेदी करणे कायदेशीर नसतानाही  शेतकर्‍यांना कोणताही मोबदला न देता या जमिनीच्या सातबारावर विकासकाचे नाव नोंदविणे, प्रधानमंत्री आवास योजना राबविणे आदी बेकायदेशीर प्रकार झालेले आहेत. त्या विरोधात अनेकदा शासन दरबारी धाव घेऊनही कारवाई न झाल्याने उपोषणाला बसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading