मान्सूनपूर्व कामे 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मान्सूनमध्ये जिल्ह्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये आणि दुर्देवाने आपत्ती आली तरी त्याचे परिणाम तीव्र होऊ नये यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणांनी काळजी घ्यावी. प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावेत. तसेच मान्सूनपूर्व करावयाची कामे 31 मे पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या. जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिका-यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मान्सून पूर्व तयारी आणि आपत्ती निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनासंदर्भात तहसीलदार राजाराम तवटे यांनी सादरीकरण केले. प्रत्येक विभागाने आणि महापालिकांनी केलेल्या मान्सून पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिका-यांनी यावेळी घेतला. जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका आणि महानगरपालिकांनी 31 मे पूर्वी आपल्या हद्दीतील नाले सफाई, रस्त्यांची कामे तसेच स्वच्छता ही मान्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत. जास्त पाऊस झाल्यास कुठेही पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्यावी. रस्ते कामांमुळे सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. होर्डिंग व्यवस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संभाव्य धोका टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. ज्या ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे, तेथील नागरिकांना स्थलांतरीत करणे, त्यांची राहण्याची, जेवणाची सोय करणे आदी कामांचे नियोजन करावे. दरड कोसळण्याच्या घटना घडू नयेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता नैसर्गिक आपत्ती होऊ नये, यासाठी काळजी घेतली जावी. आपत्ती रोखू शकलो नाही तरी त्याचे सौम्यीकरण करण्यासाठी तसंच कमीत कमी नुकसान होईल यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवल्या जाव्यात. आपत्ती काळात तातडीने मदत पोहचविण्यासाठी नियोजन करावे. यासाठी एनडीआरएफ, पोलीस, आपदा मित्र यांची मदत घ्यावी असेही शिनगारे यांनी सांगितले.
हवामान खात्याने वेळोवेळी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील नियोजन करावे. प्रत्येक विभागाने आपल्या अंतर्गत घटना प्रतिसाद प्रणाली तयार करून सादर करावी. तसेच आपत्ती काळात अफवा पसरवू नये यासाठी नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोचविण्याची खबरदारी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading