नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणामुळे ठाणेकरांचा द्राविडी प्राणायाम

नाशिककडे जाणाऱ्या महामार्गाचे माजिवडा लगतच्या भागात रुंदीकरण होत असल्याने राबोडी, बाळकुम, साकेत, रुस्तमजी आदी परिसरातील वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यासाठी पर्यायी रस्ता खुला करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. नाशिककडे जाणाऱ्या महामार्गाचे माजिवडा भागात रुंदीकरण होत असल्याने जवळील साकेत, रुस्तमजी, राबोडी आणि बाळकुम परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकत असल्याने रुग्णांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने या परिसरातील नागरीकांना घरी परतताना उलट प्रवास करावा लागतो. एकूणच वाहतूक कोंडीबरोबरच इंधन, वेळ आणि पैशाची नाहक उधळपट्टी होत आहे. या समस्येबाबत या भागातील अनेक नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर केळकर यांनी तातडीने रस्त्याची पाहणी केली. वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क करून ही बाब निदर्शनास आणून दिली आणि पर्यायी मार्ग म्हणून मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीचा रस्ता खुला करण्याची मागणी केली. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यास वाहतूक कोंडी टळून इंधन, वेळ आणि पैशांचीही बचत होणार असल्याचं त्यांनी सांगितले. बाळासाहेब पाटील यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. लवकरच वाहतूक विभाग आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पर्यायी रस्ता खुला करण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली. या पर्यायी रस्त्यामुळे माजिवडा, बाळकुम, राबोडी, साकेत आदी भागातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading