नालेसफाईच्या कामात सर्व विभागांनी समन्वय ठेवावा – महापालिका आयुक्त

ठाणे महापालिका हद्दीतील नाले सफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे करताना सर्व विभागांनी समन्वय ठेवावा आणि ३१ मे च्या आधी नालेसफाई पूर्ण करावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत सुमारे ३०८ किमी अंतराचे १२९ छोटे आणि मोठे नाले आहेत. पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई करण्यात येते. नाले सफाई वर्षभर केली जाते. मात्र पावसाळ्यापूर्वी घनकचरा विभागामार्फत नाल्यांची काटेकोर सफाई करण्यात येते. पावसाळ्यात पाणी साठू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. वर्तकनगर प्रभाग समिती वगळता इतर आठही प्रभाग समितींमध्ये नालेसफाईचे काम सुरू झाले आहे. वर्तकनगरमधील कामे लवकरच सुरू होणार आहेत. नाले सफाई करताना त्यात जलवाहिन्या, वीज वाहिन्या येतात. त्यामुळे या सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच पाणी साचणाऱ्या सखल भागातील नाले, तसेच पावसाळी पाण्याचा निचरा करणारी गटारे व्यवस्थित स्वच्छ केली जावीत. काही गटारांच्या सफाईचा निविदेतच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी साचण्याची पारंपरिक ठिकाणे शोधून तेथीलसर्व बाजूंच्या गटारांची सफाई केली जावी, त्यावर संबंधित प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष असावे असेही आयुक्तांनी सांगितले. प्रभागक्षेत्रात कार्यकारी अभियंता, उपमुख्यस्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक यांना नालेसफाईच्या कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे. यावर्षी नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी फोटो आणि चित्रीकरण यांच्या सोबत ड्रोनचाही वापर केला जात आहे. सर्व नाल्यांचे सफाई पूर्व ड्रोन चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सफाई नंतरचेही चित्रीकरण केले जाणार असून देयके अदा करण्यापूर्वी दोन्ही परिस्थितीची तुलना केली जाईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. समाधानकारक पद्धतीने नाले सफाई केली तर देयके थकीत राहणार नाहीत, याबद्दल कंत्राटदारांनी खात्री बाळगावी. मात्र कामाचा दर्जा सर्वोत्तम नसेल तर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नाल्यातील काढलेल्या गाळाची ४८ तासांच्या आत विल्हेवाट लावणे, काढलेल्या गाळावर जंतुनाशक आणि दुर्गंधीनाशक यांची फवारणी करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास प्रती घटना दंड आकारण्याची तरतूद निविदेत करण्यात आली आहे. त्याचबरोबर, नाले सफाई करणाऱ्या कामगारांना गमबुट, मास्क, हातमोजे पुरवणे आवश्यक आहे. नाले, गटारं व्यवस्थित साफ न केल्याने पाणी साठल्यास प्रती घटना २० हजार रुपयांच्या दंडाची आकारणी केली जाणार आहे. पावसाळ्यात गटारे तुंबल्यास सफाईचे काम ठेकेदाराला करावे लागेल. त्याचा वेगळा मोबदला दिला जाणार नाही. त्यासाठी, २५ टक्के रक्कम राखून ठेवून ती पावसाळ्यानंतर देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, पावसाळ्यात नाल्यातील अडथळे काढणे, वनस्पती आणि इतर वाहून आलेल्या गोष्टी काढणे, पाणी वाहते ठेवणे ही कामे करण्यात येतील. पावसाळा संपल्यानंतर वनस्पती, केर कचरा, प्लास्टिक काढणे आणि नाले स्वच्छ ठेवणे या कामाचा समावेश निविदेत करण्यात आला आहे. उथळसर, मानपाडा, कळवा या विभागातील नालेसफाईसाठी आवश्यक तेथे प्लाटून मशीनचा वापर करण्यात येत आहे. तसेच इतर विभागात नाले सफाई करताना जेसीबी पोकेलन मशीन क्रेनद्वारे नाल्यामध्ये सोडल्या जात आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading