नाखवा कुटुंबांच्या गौराईचे यंदा १०५ व्या वर्षात पदार्पण

चेंदणी कोळीवाडा येथील नाखवा कुटुंबांच्या गौराईने यंदा १०५ व्या वर्षात पदार्पण केले. पाचव्या पिढीने यंदा उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने गौराईचा सण थाटामाटात साजरा केला. सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या ठाणे शहरात नाखवा कुटुंबियांची गौराई वैशिष्ट्य ठरली आहे. ठाणे शहरातील आगरी-कोळी बांधवांमध्ये गौराईला मानाचे स्थान आहे. चेंदणी कोळीवाड्यातील प्रतिष्ठित कुटुंबातील कै. जानकीबाई नाखवा आणि फकीरा नाखवा यांनी १ सप्टेंबर १९१८ रोजी गौराईची स्थापना केली होती. त्यानंतर आज पाचव्या पिढीपर्यंत हा उत्सव साजरा केला जात आहे. कोविड आपत्तीच्या काळात कुटुंब प्रमुख प्रफूल्ल नाखवा यांनी गौराईच्या कुटुंबातील स्थापनेची माहिती जमा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी प्रत्येक वर्षाच्या गौराई उत्सवाचा तपशील मिळवला. त्यावेळी त्यांना आपल्या गौराईला १०० वर्ष उलटून गेली असल्याचे लक्षात आले. मात्र, कोविड आपत्तीमुळे शतकोत्तर सोहळा साजरा करता आला नव्हता. यंदा निर्बंध उठल्यानंतर चंद्रकांत आणि प्रफुल्ल नाखवा, पाचव्या पिढीतील वैभव नाखवा आणि बंधु यांनी १०५ वे वर्ष उत्साहाने साजरे करण्याचे ठरविले. त्यानुसार चेंदणी कोळीवाडा येथे यंदाचा उत्सव सुमारे पावणेदोनशेहून अधिक नाखवा कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटामाटात साजरा झाला. गौराईचे पारंपरिक पद्धतीने आवाहन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पुजन करून सोमवारी सायंकाळी मिरवणूक काढून निरोप देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading