धर्माधिकारी प्रतिष्ठान दीपस्तंभासारखे – मुख्यमंत्री

धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या तीनशे चारशे वर्षांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहोत. माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. या सोहळ्याला मी एक श्री सदस्य म्हणून उपस्थित असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनसागराला अभिवादन केले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले, एवढ्या मोठ्या महासागरासमोर काय बोलावं हे सुचत नाही. मी आज आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून उभा नाही तर मी आपल्या परिवारातला एक श्री सदस्य म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. ‘पाहिला जनांचा सागर भरली ज्ञानाची घागर’ असे सांगत जनांचा महासागर या ठिकाणी लोटलेला आहे. खरं म्हणजे सूर्य पूर्ण ताकदीने आग ओकतोय आणि याठिकाणी सकाळपासून भर उन्हामध्ये बसलेला एकही माणूस उठत नाही ही आप्पासाहेबांची ताकद आहे. प्रत्येक श्री सदस्य शिस्तीचे करत असतो आणि मला या ठिकाणी सांगावसं वाटतं की माझी पत्नी आणि मुलगा खासदार श्रीकांत देखील या श्री सदस्यांमध्ये समोर बसलेले आहेत. हा जनसागर आप्पासाहेबांच्या प्रेमापोटी परवा रात्रीपासून याठिकाणी उपस्थित आहे. राजकीय सत्तेपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते त्याचे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय. राजकीय अध्यात्मिक अधिष्ठानाची जोड, आशीर्वाद आणि प्रेरणा या ठिकाणी लागते त्याचा जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ही गर्दी सगळे रेकॉर्ड मोडणारी असून याचे रेकॉर्ड मोडायचा असेल तर ते फक्त आणि फक्त आप्पा साहेबांचे श्री सदस्यच मोडू शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या अथांग जनसागरामध्ये आप्पासाहेबांच्या रूपाने देव दिसतोय. नानासाहेबांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता पण त्यांच्या निधनानंतर याच मैदानामध्ये आप्पासाहेबांनी स्वीकारला होता आणि त्याच मैदानामध्ये आज पुन्हा २०२२ चा महाराष्ट्र भूषण आप्पासाहेबांना देण्यात आला हा योगायोग आहे. ज्यावेळेस माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यावेळी माझं कुटुंब उध्वस्त झालं होतं. त्यावेळेस मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांनी आधार दिला आणि आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन केलं दिशा दाखवली आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आज मुख्यमंत्री नाही तर एक श्री सदस्य म्हणून उभा आहे. त्यामध्ये आप्पासाहेबांचे मोठे योगदान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेय. कुटुंब उध्वस्त होत असताना त्यांना वाचवण्याचं, दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडा यासारख्या अनिष्ट प्रथा दूर करण्याचे काम नानासाहेबांनी, आप्पासाहेबांनी केलं. मोह, माया, मत्सर याच्यापासून आपण दूर कसं जाऊ याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली. सरकार म्हणून काम करीत असताना आम्ही देखील आप्पासाहेबांचे विचार आचरणात आणून सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ठिपक्या ठिपक्यांनी रांगोळी तयार होते तसे माणसं जोडून माणुसकीचा महासागर आप्पासाहेबांनी निर्माण केला आहे. अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस तू.. या बहिणाबाईंना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आप्पासाहेबांच्या माणूस घडविण्याच्या याच कार्यातून मिळते. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर, जलसंधारण, ग्रामस्वच्छता, शिक्षण, मार्गदर्शन अशा सर्व मार्गांनी आप्पासाहेबांनी समाज घडविला आहे. त्यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठान हे मला एखाद्या दीपस्तंभासारखे वाटते असे सांगत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केल्यामुळे महाराष्ट्राचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading