धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुल यांचे भूमिपूजन

अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या जोडीने आता शिक्षण आणि आरोग्य या मुलभूत गरजा झाल्या आहेत. त्यातील आरोग्य सेवा देणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालयाची उभारणी हे लोककल्याणाचे कार्य आहे. जीवनशैलीशी निगडित आजार वाढत असल्याने अशा अद्ययावत सुविधांची गरज आहे. शासन, समाज आणि संघटना संवेदनशीलपणे वागू लागल्या की  असे कार्य उभे राहते. या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ठाणे महानगरपालिका, जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुल यांचे भूमिपूजन भागवत यांच्या हस्ते झाले. बाळकूम येथे ग्लोबल हॉस्पिटलच्या प्रांगणातील हा भूमिपूजन सोहळा दादा भगवान फाऊंडेशनचे दिपक देसाई, राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री  कपिल पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री   शंभूराज देसाई, ठाणे महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर, ‘जितो’चे विश्वस्त अजय आशर आणि टाटा रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याला आनंद दिला, दु:ख दूर करण्याचे काम केले. त्या गुरुवर्य आनंद दिघे यांच्या नावाने हे कॅन्सर हॉस्पिटल उभे राहात आहे, ही माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यात केले. हे दिघे साहेबांचे जिवंत स्मारक ठरेल, त्यातून अनेकांना जीवदान मिळेल. उशीर होण्यापूर्वी रुग्णाला अद्ययावत उपचार, सुविधा येथे मिळतील. रुग्ण येथून बरा होऊन जाईल. या उपक्रमासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. धर्मवीर आनंद दिघे यांची ओळख सेवा करणारा नेता अशी होती. त्यांनी उभ्या केलेल्या रुग्णवाहिका सेवेमुळे दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवरील जीवही वाचले होते. त्यांचेच सेवा कार्य मुख्यमंत्री शिंदे पुढे चालवत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये २०३५ पर्यंत मोठी वाढ होण्याची भीती आहे. कॅन्सर एका व्यक्तीला झाला तरी त्याचा जाच सर्व परिवाराला होतो. त्याचा देशाच्या श्रमशक्तीवरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे जलद आणि प्रभावी उपचाराची गरज असून ती या रुग्णालयाच्या माध्यमातून पूर्ण होईल. आस्था आणि मानवतेचे हे मंदिर असून येथून रुग्ण बरा होऊनच जाईल, असेही  फडणवीस म्हणाले.धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालयामुळे रोगापासून मुक्तता आणि त्रिमंदिर संकुलामुळे संसारापासून मुक्ती असे दोन्ही उद्देश येथे साध्य होतील, असे उद्गार दादा भगवान फाऊंडेशनचे दिपक देसाई यांनी या सोहळ्यात काढले. जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्टतर्फे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने जमीन उपलब्ध करून दिली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालय प्रस्तावित कर्करोग रुग्णालयासाठी तांत्रिक सहकार्य करीत आहे.  रुग्णालयाच्या बांधकामासोबत, उपचार साधनांचा खर्च जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट करणार आहे. साडेपाच एकर जागेवर १० लाख फूटांचे बांधकाम करण्यात येणार असून बांधकाम क्षेत्रातील कंपनी लार्सन अण्ड टुब्रो हे काम करणार आहे.धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालयात ६०० रुग्ण खाटांसह, बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी), आंतर रुग्ण सेवा, रेडिएशन, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, एक्स रे, सिटी स्कॅन, एमआरआय, डे केअर सुविधा, पॅथॉलॉजी आदी सुविधा असतील. कॅन्सर रुग्णांसाठी वरदान ठरणारी नव्याने विकसित झालेली अत्याधुनिक प्रोटोन थेरपीचाही या रुग्णालयातील उपचार सुविधांमध्ये समावेश असेल. तसेच, उपचाराच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवासासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली निवास व्यवस्था असेल. त्यात भोजन व इतर प्राथमिक सुविधांसह निवास व्यवस्था उपलब्ध असतील. ती अल्पदरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध राहील. तसेच, मुंबईतील टाटा मेमोरिअल रुग्णालयामध्ये ज्या प्रमाणे रुग्ण सुविधा दिल्या जातात, त्याचप्रमाणे ठाणे कर्करोग रुग्णालयामध्ये रुग्णांना किफायतशीर दरात रुग्णसेवा दिली जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading