धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठी देखील महत्त्वाचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केले. टाटा मेमोरियल सेंटर, ठाणे महानगरपालिका आणि जितो ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून बाळकूम रोड(ग्लोबल हॉस्पिटल)ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल व त्रिमंदीर संकुलाचा भूमीपूजन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत व दादा भगवान फाऊंडेशनचे दीपकभाई देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला,  त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. मुख्यमंत्री  शिंदे पुढे म्हणाले की, राज्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. औषधोपचाराबरोबरच आशिर्वाद व प्रार्थनेचीही गरज असते. या हॉस्पिटलच्या नावातच आनंद आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये फक्त इतरांच्या आनंदाचाच विचार केला, दुसऱ्याचा आनंद हाच आपला आनंद मानला. दुसऱ्यांचे दुःख कमी करण्याचे काम केले, अशा धर्मवीर आनंद दिघेंचे नाव या कॅन्सर हॉस्पिटलला देण्यात आले आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. ते पुढे म्हणाले, परिवाराच्या दुःखापेक्षा समाजाचे दुःख आपले दुःख  मानणाऱ्यांपैकी आम्ही  आहोत. या हॉस्पिटलची समाजाला नितांत आवश्यकता होती. अत्याधुनिक सुविधा या हॉस्पिटलमध्ये निर्माण केल्या जाणार आहेत. चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू होईल. या हॉस्पिटलसाठी शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. दि.३१ डिसेंबरचा दिवस आम्ही आजही रक्तदानाने साजरा करतो. ही परंपरा दिघे साहेबांनी सुरू केली होती. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो.  आज मी जरी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो व यापुढेही असेच काम करीत राहीन. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की, आजच्या काळाची गरज उत्तम शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी आहेत. आपल्या देशात सोयीसुविधांचा अभाव आहे. इच्छा असूनही चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळत नाही. या सुविधा सहज मिळू शकतील अशा अंतरावर असायला हव्यात. सध्याच्या काळात कॅन्सर हॉस्पिटल असणे आवश्यक आहे. मानवाची बदलती दिनचर्या (लाईफ स्टाईल) आणि सायकोसोमॅटिक आजारांमुळे हे सगळे होत आहे. कॅन्सर हॉस्पिटल हे सेवा कार्य आहे. आजच्या जीवनात संवेदना महत्त्वाची आहे. आपण चांगले केले तर आपल्याकडे चांगलेच येईल. आपण चांगले दिले तर आपल्याला चांगले मिळविता येईल. केवळ लाभासाठी काम करण्याची भावना ठेवल्यास लाभ होत नसतो. चांगले केले तरच चांगले होईल, यावर विश्वास ठेवायलाच हवा. सर्वांच्या आयुष्यातून दुःख जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ते पुढे म्हणाले, सर्वांना जवळ पडेल आणि परवडतील अशी कॅन्सर हॉस्पिटल राज्यात होणे गरजेचे आहे. आपल्या देशात प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक दृष्टीने पाहिली जाते. पवित्रता, चैतन्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शिवकार्य हीच जीव सेवा आहे. मीच केले हे मनात कधीही न आणता केवळ सेवा कार्य करणे आवश्यक आहे. ज्यांची सेवा करतोय त्यांच्याशी संवाद साधायला हवा, त्यांना अजून काय चांगले देता येईल यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आयोजकांतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात येत होता. मुख्यमंत्र्यांच्या सत्काराच्या वेळी सरसंघचालक मोहन भागवत उभे राहत असताना मुख्यमंत्री. शिंदे यांनी नम्रपणे त्यांना बसण्याची विनंती केली. हा क्षण उपस्थित सर्वांनाच खूप भावला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading