दिव्यांग मतदारांना मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी ७४० रिक्षा तसंच २० बसेसचं नियोजन

लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मतदान करणं सोपं व्हावं यासाठी विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. एका पत्रकार परिषदेत जिल्हा निवडणूक अधिका-यांनी या व्यवस्थेची माहिती दिली. मतदानाच्या दिवशी म्हणजे २९ एप्रिलला विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी ७४० रिक्षा आणि २० बसेस तैनात केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाच्या दिवशी करण्यात आलेल्या या वाहतूक व्यवस्थेचं नियोजन आणि रंगीत तालीम पत्रकारांसमवेत करण्यात आली. जिल्ह्यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात ३ हजार ५६५, कल्याण लोकसभा मतदारसंघात २ हजार २६९ तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात २ हजार १११ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जादा दिव्यांग मतदार असतील. या अनुषंगाने आणि दिव्यांग व्यक्तीसोबत एक सहाय्यक व्यक्ती अशी संख्या गृहीत धरून विधानसभा मतदारसंघ निहाय वाहन व्यवस्थेचं नियोजन करण्यात आल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. शहरी भागामध्ये रिंगरूट तयार करण्यात आले असून मतदानाच्या दिवशी प्रत्येकी २ बसेस येण्या-जाण्याच्या मार्गावर दिव्यांग मतदारांना सुविधा देतील. प्रत्येक बसमध्ये दिव्यांग मित्र म्हणून एक सहाय्यक उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading