भूमिपुत्रांच्या समस्यांसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं शिवसेना-भारतीय जनता पक्षाला आगरी सेनेचा पाठिंबा

मुख्यमंत्र्यांनी भूमीपुत्रांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळे आगरी सेनेनं शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आज एका पत्रकार परिषदेत आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांनी ही घोषणा केली. ठाणे, रायगड, मुंबई, नाशिक या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आगरी सेनेनं आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. स्थानिक भूमिपुत्रांच्या जागा भांडवलदारानी विकल्यास त्यामध्ये २० टक्के वाटा स्थानिक भूमीपुत्रांना मिळावा, रेतीचा रॉयल्टीचा प्रश्न निकालात काढावा, बुलेट ट्रेनसाठी भूमीपुत्रांच्या ज्या जागा घेतल्या जाणार आहेत त्या बदल्यात ५० टक्के स्टॉल्स मिळावे, पालघर जिल्ह्यातील ५ हजार एकर जमीन काँग्रेसच्या नेत्याला लीजवर देण्यात आली आहे ती पुन्हा मिळावी, महिला फेडरेशन तयार करून मच्छी व्यवसाय सक्षम करावा, जुई बंदराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा अशा आमच्या काही मागण्यांवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आगरी समाजाच्या अनेक संघटना असल्या तरी त्यातल्या काही फक्त कागदावर असून आगरी सेना हीच खरी आगरी समाजाचं प्रतिनिधीत्व करते असा दावा यावेळी करण्यात आला. कल्याणमध्ये बाबाजी पाटील हे जरी लोकसभा निवडणूक लढवत असले तरी त्यांनी समाजासाठी फारसं काही केलेलं नाही. नेवाळी प्रश्नातही ते कुठे होते असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading