दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार – बच्चू कडू

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागातील दिव्यांगांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या, अडचणी ऐकून घेत आहोत. त्यातून एक सर्वसमावेशक दिव्यांग धोरण तयार करण्यात येईल. हे धोरण दिव्यांगांना सावली देण्याचे कार्य करेल, असे प्रतिपादन “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” अभियानाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यावेळी केले.

दिव्यांग कल्याण विभागाच्या “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” उपक्रमाच्या ठाणे जिल्हास्तरीय लाभ वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” उपक्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कडू बोलत होते. कडू म्हणाले की, देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मागणी मान्य केल्यामुळे हे मंत्रालय अस्तित्वात आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या ५ टक्के एवढा निधी दिव्यांगांसाठी देण्यात यावा. अजिबात चालता न येणारे, झोपून राहणाऱ्या दिव्यांगांची माहिती गोळा करून त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याची आवश्यकता आहे. ज्यांना काहीच लाभ मिळत नाही त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. दिव्यांगांच्या पाठीशी प्रशासनाने उभे राहावे, असे आवाहनही कडू यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले की, दिव्यांगांना हक्काने आणि अभिमानाने जगता आले तरच आपल्या कामाची कर्तव्यपूर्तता होईल. ठाणे जिल्ह्यात दिव्यांगांसाठीच्या योजना १०० टक्के राबविण्यात येतील. तसेच दिव्यांग बांधवांसाठी असलेला निधी पुरेपूर योग्य आणि पारदर्शक पद्धतीने खर्च होईल, याची दक्षता घेण्यात येईल. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिंदल म्हणाले की, आजच्या मेळाव्यात ॲमेझॉन ही कंपनी ३०० दिव्यांग बांधवांना नोकरी देणार आहे. जिल्हा परिषद ठाणे आणि प्रगती अंध विद्यालयाने अंध बांधवांसाठी ब्रेल लिपीमधील पुस्तिका तयार केली आहे. जिल्हा परिषद ठाणे, जिल्हा प्रशासन हे कायम दिव्यांग बांधवांसोबत आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” उपक्रमाच्या जिल्हास्तरीय लाभ वाटप कार्यक्रमात सुमारे ४० ते ५० स्टॉल उभारण्यात आले होते. दिव्यांग बांधवांसाठी ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय, पाण्याची सोय, बैठक व्यवस्था, जेवण आदींची सोय करण्यात आली होती. त्यासाठी शासकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक मदत करीत होते. विशेष म्हणजे उद्घाटन समारंभ संपल्यानंतर बच्चू कडू यांनी उपस्थित प्रत्येक दिव्यांग बांधवांशी वैयक्तिक संवाद साधित त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अशोक भोईर आणि आंतरराष्ट्रीय अंध महिला फुटबॉल पटू कोमल गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना स्वयंरोजगार पतपुरवठा प्रमाणपत्र, व्हिलचेअर वाटप तसेच वैयक्तिक लाभांचे वाटप करण्यात आले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading