दिवा रेल्वे स्थानकाजवळील दिवा पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम वेगाने

दिवा रेल्वे स्थानकाजवळील दिवा पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम वेगाने करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक भूसंपादन आणि जोड रस्ते यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. दिवा पूर्व आणि पश्चिम येथील उड्डाणपुलाचे काम आणि परिसरातील व्यवस्था यांची पाहणी आयुक्त बांगर यांनी केली. उड्डाणपुलाचे जोड रस्ते आणि गटार यांचे काम पूर्ण झाल्यावर भिंतीचे काम करता येईल. त्यामुळे येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करावे. पूलाच्या दोन्ही बाजूंच्या भागात जिथे भूसंपादन पूर्ण झाले आहे तेथील रस्त्याची कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत. येथील वर्दळ लक्षात घेता रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त काम करण्यावर भर द्यावा, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. दिवा पश्चिम येथील महापालिका शाळा परिसर, गावदेवी मंदिर या पट्ट्यात उड्डाणपूलाची मार्गिका उतरणार आहे. त्या मार्गिकेच्या संपूर्ण भागाची पाहणी आयुक्त बांगर यांनी केली. रेल्वेचेही उड्डाणपुलासाठी समांतर काम सुरू आहे. त्यांच्या कामाशी समन्वय साधून पूर्व बाजूचे गर्डर लॉन्चिंग आणि डेक स्लॅब ही कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होऊ शकतील. त्यानुसार नियोजन करावे असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले. उड्डाणपूलाच्या पाहणीनंतर, दिवा पूर्व आणि पश्चिम येथील रेल्वेला समांतर असलेल्या कल्याण दिशेकडील कच्च्या रस्त्यांची पाहणी आयुक्त बांगर यांनी केली. रेल्वेच्या मालमत्तेतील रस्त्याच्या काही भागामुळे येथील काम थांबले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानुसार, अधिक माहिती घेऊन रेल्वेशी संबंधित अधिकारी चर्चा करतील, असे आयुक्तांनी सांगितले.
दिवा पूर्व येथील काही भागातील रस्त्याचे डांबरीकरण लवकरच केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, शिळफाटा ते दिवा येथील साडेपाच किमी लांबीच्या ९०० मीटर व्यासाच्या पाईपलाईनचे काम दसऱ्याला सुरू होईल, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. मुंब्रा देवी रोड, स्टेशन रोड, दिवा सर्कल या भागाची पाहणीही करण्यात आली. काही भागात रस्त्याच्या मध्ये असलेल्या विजेचे खांब काढण्याबद्दल आयुक्तांनी विद्युत विभागाला निर्देश दिले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading