दिवा परिसरातील देसाई गावात आरक्षित असलेल्या २४ हेक्टर जागेवर उद्यान उभारणीचा मार्ग मोकळा

दिवा परिसरातील देसाई गावात कत्तलखाना आणि लेदर प्रोसेसिंग युनिटसाठी आरक्षित असलेल्या २४ हेक्टर जागेवर उद्यान उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेने या आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बदलांना मंजूरी दिल्यानंतर शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ठाणे शहराचा विकास आराखडा १४ मे, २००३ पासून अंमलात आला आहे. या आराखड्यानुसार शिळ कल्याण रोडवरील मौजे देसाई या गावातील १४ हेक्टर जागा कत्तलखान्यासाठी तर ११ हेक्टर जागा लेदर प्रोसेसिंग युनिटसाठी आरक्षित होती. गेल्या काही वर्षांत या भागातील लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या लोकसंख्येच्या गरजेनुसार नागरी सुविधा आणि मनोरंजनाच्या ठिकाणांची निर्मिती करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी शहर विकास आराखड्यातील प्रस्तावित आरक्षणांमध्ये बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही दोन्ही आरक्षण वगळून ती जागा उद्यानासाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार या फेरबदलांना राज्य सरकारची परवानगी मागण्यात आली होती. या फेरबदलांना मंजूरी देणारी अधिसूचना २ फेब्रुवारी रोजी काढण्यात आली आहे. या आरक्षण बदलासाठी कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. या जागेवर उद्यानाची उभारणी केल्यानंतर स्थानिक रहिवाशांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading