दिवाळी सणाचे दिवस ठरवले जातात, त्याच्या मागे काय निकष असतो याची माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. आज वसुबारस असून आश्विन कृष्ण पक्षातील द्वादशीला गोवत्स द्वादशी म्हणजेच वसूबारस म्हणतात. ज्या दिवशी प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी असेल त्या दिवशी गोवत्स द्वादशी साजरी केली जाते. जर दोन दिवस प्रदोषकाली असेल तर मात्र पूर्वदिवशी गोवत्स द्वादशी साजरी केली जाते असे शास्त्रात सांगितले आहे. आज सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी आश्विन कृष्ण एकादशी संपून द्वादशी सुरू झाली आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ११ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३८ मिनिटांपर्यंत प्रदोषकाल आहे. उद्या प्रदोषकाली द्वादशी नाही म्हणून गोवत्स द्वादशी / वसूबारस आज साजरी करण्यात आली. उद्या धनत्रयोदशी असून आश्विन कृष्ण त्रयोदशी प्रदोषकाली असेल त्यादिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. उद्या संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून आश्विन कृष्ण द्वादशी संपून त्रयोदशी सुरू होत आहे. प्रदोषकाल संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३७मिनिटांपर्यंत आहे. या कालात म्हणजे प्रदोषकालात त्रयोदशी आहे. म्हणून उद्या धनत्रयोदशी साजरी करावी असं दा कृ सोमण यांनी सांगितलं.