दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे १७ सप्टेंबर रोजी इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत सहभागी होण्याचं पालिका आयुक्तांचे आवाहन

स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छता लीग या अभियानात देशातील ३०८५ शहरांचा सहभाग असून महाराष्ट्रातील एकूण ४११ शहरांचा यात समावेश आहे. १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हा पंधरवडा स्वच्छता लीग म्हणून साजरा केला जाणार असून इंडियन स्वच्छता लीग 2.0 या उपक्रमातंर्गत ठाणे शहराच्या ‘ठाणे टायटन्स’या बोधचिन्हाचे अनावरण संघाचे कर्णधार आणि प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आपल्या ठाणे शहराची स्वच्छता ही उत्तम असली पाहिजे आणि आपल्या शहराने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली पाहिजे. त्यासाठी इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत स्वत: सहभागी होणार आहे. ठाणेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाऊ कदम यांनी यावेळी केले. १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हा पंधरवडा स्वच्छता लीग म्हणून साजरा केला जाणार असून ठाणे शहराची ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय अशी ओळख आहे. या शहराला स्वच्छ शहराची ओळख मिळवून देण्याचा आपण सगळ्यांनी जोरदार प्रयत्न करू या, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले. इंडियन स्वच्छता लीगची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे ज्या ठिकाणी कचरा होतो त्या जागा हेरुन तिथून कचऱ्याचे समूळ उच्चाटन करणे, समुद्र किनारे, टेकड्या, पर्यटन स्थळे, शहरातील मुख्य सार्वजनिक ठिकाणी तरुणांच्या पुढाकाराने विविध संघाद्वारे मोठ्या प्रमाणात स्वच्छता करणे, कचरामुक्त शहरांसाठी तरुणाच्या स्वच्छतेबाबतच्या सहभागाला चालना देणे हे असून यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. याच उपक्रमात रविवार, १७ सप्टेंबर रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे इंडियन स्वच्छता लीगच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत ठाणेकर नागरिकांनी सहभाग घ्यावा, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. स्पर्धेची लिंक सर्व शाळांना देण्यात येणार असून शाळांनी विद्यार्थी आणि पालक यांचेमार्फत रजिस्ट्रर करुन हा सर्व डेटा महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे सादर करावा. या स्पर्धेत ज्या शाळा प्रथम क्रमांक प्राप्त करतील त्या शाळेत ठाणे टायटन्स संघाचे कर्णधार अभिनेते भाऊ कदम हे स्वत: भेट देतील असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading