ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात अमृत कलश यात्रेस प्रारंभ

मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश.. मातीला नमन वीरांना वंदन . देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना समर्पित अमृत कलश यात्रेचा प्रारंभ महापालिका कार्यक्षेत्रात आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या दुसऱ्या टप्प्यात ठाणे महापालिकेच्या विविध प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील विभागातील नागरिकांकडून अमृतकलशामध्ये माती किंवा तांदूळ गोळा करण्यात येणार आहे. नौपाडा प्रभागसमिती हद्दीत अमृत कलश यात्रा काढून घराघरातून माती आणि तांदूळ जमा करण्यात आले, या यात्रेत ठाणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, टीडीआरएफचे जवान, सुरक्षारक्षक तसेच शाळांमधील स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या अमृत कलश यात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गडकरी रंगायतन येथील आवारात पंचप्रण शपथ घेण्यात आली, यावेळी अग्न‍िशामक दलाच्यावतीने बँड वाजूवन या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण मासुंदा तलावाभोवती काढण्यात आलेल्या या अमृत कलश यात्रेत घोडागाडी, अग्शिनशामक दलातील वाहने, रुग्ण्वाहिका, आपत्कालीन विभागाची वाहने आदी सहभागी झाले होते. ही अमृतकलश यात्रा 30 सप्टेंबर पर्यत महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागसमिती अंतर्गत फिरणार आहे. या कलशामध्ये जमा झालेली माती आणि तांदूळ ठाणे महापालिका मुख्यालयाच्या माध्यमातून 27 ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे पाठविण्यात येणार आहेत. तद्नंतर हा अमृत कलश राज्य शासनामार्फत नवी दिल्ली मधील कर्तव्यपथ येथे उभारण्यात येणाऱ्या अमृतवाटिकेमध्ये मिसळण्यात येणार आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना समर्पित अमृत कलश यात्रा या अभियानामध्ये ठाणेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading