आयुष्मान भव” अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ

जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची सर्वंकष जबाबदारी घेऊन त्यांना आवश्यक असलेल्या उपचारासाठी लागणारे सर्व सहकार्य करणे, हे आपले काम आहे. त्यासाठी “आयुष्मान भव” अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला आयुष्मान आणि आभा कार्ड देण्याचे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.“आयुष्मान भव” अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले की, “आयुष्मान भव” हे अभियान राबविण्यात आशा ताईंचा मोठा हातभार आहे. आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड वाटप करून प्रत्येकाला हे कार्ड मिळेल, याची शाश्वती देणे, हा या अभियानाचा एक भाग असून चांगली आरोग्य सेवा पुरविणे, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. “आयुष्मान भव” अभियानाच्या माध्यमातून अवयवदान मोहीम, स्वच्छता अभियान, आयुष्मान मेळावा आणि आयुष्मान सभा आणि अंगणवाडीमधील मुलांची तपासणी, असे उपक्रम राबवून जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारचे आरोग्य मिळवून देऊ, असा विश्वास आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे यांनी “आयुष्मान भव” अभियानाची माहिती दिली. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील पाच महिलांना आयुष्मान कार्डचे तसेच पाच महिलांना आभा कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी नि:क्षय मित्र म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कपिल पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पवार, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. गीता खरात, माजी नगरसेवक किरण भोईर, अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरीचे मुख्य महाव्यवस्थापक पी.के. भूमरकर, निलेश भोईर, हरिश पाष्टे, प्रदीप गिते यांच्यासह इतरांना गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी तंबाखूमुक्ती आणि अवयवदानासंबंधीची शपथ घेतली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading